नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या ऑनलाइन फसवणूक ही एक चिंताजनक बाब बनली आहे. विशेषतः एटीएम मशीनवर स्किमर डिव्हाइसेस द्वारे फसवणूक करणे, ही सर्वसामान्य पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. तसेच बँकेने मनाई केली असूनही अनेक ग्राहक आपले एटीएम डीटेल्स अनोळखी लोकांसोबत शेअर करतात, याचाही गैरफायदा अशा ऑनलाईन चोरांना होतो. सध्या देशातील एटीएम घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नुकताच प्रचंड मोठा एटीएम घोटाळा उघड झाला मात्र तो समोर येण्यासाठी तब्बल आठ महिने लागले आहेत.
असे लांबविले पैसे…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरामध्ये एटीएम फसवणूकीच्या एकूण प्रकरणांमध्ये सुमारे १ हजार पर्यंत इतकी वाढ झाली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, मुंबईमध्ये सुमारे ३०० प्रकरणे समोर आली आहेत. दोन नंबरवर राजधानी दिल्ली असून तेथे सुमारे २०० प्रकरणे समोर आली आहेत. आता पुन्हा एटीएम मशीनमधील पैसे चोरी प्रकरणी मोठी घटना समोर आली आहे. देशातील १८ राज्यातील २००एटीएम सेंटरमध्ये मोठी चोरी झाली आहे.
तब्बल आठ महिने
एटीएम मशीनमधून २ दिवसांत तब्बल अडीच कोटी रूपये गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएममधील पैसे चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. चोरट्यानी युक्ती करून एटीएम सेंटरचा वीजपुरवठा तात्पुरता खंडीत करून तांत्रिक बिघाड निर्माण करून कोट्यवधी रुपये गायब केले आहेत. मात्र हा एटीएम घोटाळा समोर येण्यासाठी तब्बल आठ महिने लागले आहेत. १२ ते १४ ऑक्टोबर २०२२ या दोन दिवसांमध्ये देशभरातील एटीएममधून कोट्यवधी रुपये काढण्यात आले आहेत.
असे आले उघडकीस..
एटीएममधील पैसे लंपास करण्यासाठी चोरट्यांनी वेगवेगळ्या बँकांच्या ८७२ डेबिट कार्डचा वापर करून अडीच कोटी रुपये लंपास केले. २७४३वेळा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा चोरीचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. आता या चोरी प्रकरणी या कंपनीनेच मुंबईतल्या वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पैसे चोरणाऱ्या या टोळीचा शोध पोलीस घेत आहेत.
तांत्रिक बिघाड
एटीएममधून पैसे काढण्यासाठी आरोपी स्वत:चे डेबिट कार्ड वापरुन सामान्य प्रक्रिया सुरु करतात. त्यानंतर पैसे एटीएम डिस्पेन्सरी शटरपर्यंत पोहोचताच. त्याठिकाणी उपस्थित असलेली दुसरी व्यक्ती तिथली इलेक्ट्रिक वायर किंवा लॅन केबल ओढून वीजपुरवठा खंडीत करते. जेणेकरुन हा तांत्रिक बिघाड असल्याचे भासवले जात होते. त्याचवेळी पहिली व्यक्ती डिस्पेंसिंग शटरमधून पैसे खेचून काढून घ्यायची. तांत्रिक बिघाडामुळे मशीनमध्ये संबंधित व्यवहाराची नोंद होत नाही आणि पैसे पुन्हा ग्राहकाच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले जातात. परिणामी यामध्ये बँकेचे नुकसान होते.
Crime ATM Centre Target Fraud Racket