पुणे – एटीएममधून रोख रक्कम चोरी केल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. परंतु पुण्यातील चिंबाली परिसरात आश्चर्यकारक घटना घडली आहे. चोरांनी आपला जीव धोक्यात घालून चोरी केली आहे. चोरांनी स्फोटकांचा वापर करून एटीएम फोडले. एटीएमचे तुकडे झाल्यानंतर चोरट्यांनी १६ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात अशा चोरीच्या प्रकाराची ही दुसरी घटना घडली आहे. जुलैमध्ये चाकण परिसरात अशीच घटना घडली होती.
पुण्यातील चिंबाली परिसरात रविवारी पहाटे ही घटना घडली आहे. चोरांनी नियोजन करून ही घटना घडवून आणली आहे. पहाटेच्या सुमारास चोरटे एटीएमजवळ पोहोचले. त्यादरम्यान परिसर सुनसान होता. चोरट्यांनी जिलेटिनच्या कांड्यांच्या मदतीने खासगी बँकेच्या एटीएमवर स्फोट घडवून आणला.
पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, की पुण्याच्या आळंदीजवळ रविवारी पहाटे चोरट्यांनी स्फोटकांचा वापर करून बँकेच्या एटीएम फोडले. त्यानंतर त्यातील पैसे काढून पलायन केले. चोरटे १७ लाख रुपये घेऊन फरारी झाले आहेत, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि श्वान दलासह एक तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पथकाने तपास सुरू केला आहे. एटीएमच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या मदतीद्वारे माहिती गोळा केली जात आहे. काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले असले तरी पोलिस चोरट्यांची ओळख पटवू शकले नाही. लवकरच याचा खुलासा होईल. या घटनेनंतर एटीएमचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये स्फोटानंतर एटीएमचे तुकडे झाल्याचे दिसत आहे.