इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पैशाचा लोभ किंवा लालस अतिशय वाईट असते, ती एखाद्या व्यक्तीला कोणत्या स्तराला नेईल नाही सांगता येत नाही. पैशाच्या लालसेपोटी काही लोभी व्यक्ती एखाद्याचा खून करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अमेरिकेतून चेन्नईला परतलेल्या दाम्पत्याची पैशाच्या लालसेपोटी घरातील नोकरानेच निर्घृण हत्या केल्याची बाब समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत (६०) आणि त्यांची पत्नी अनुराधा (५५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. श्रीकांत हा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. आरोपी दाम्पत्याचे पाच कोटी रुपये घेऊन नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी आरोपींकडून नऊ किलो सोने जप्त केले असून त्यात दाम्पत्याकडून लुटलेल्या ५ कोटी रुपयांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या जोडप्याच्या घरगुती नोकर तथा मदतनीसाने त्यांची त्यांच्याच घरात हत्या केली आणि त्यानंतर दोघांचे मृतदेह चेन्नईबाहेरील त्यांच्या फार्म हाऊसमध्ये पुरल्याचा आरोप आहे. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलीने पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. तेव्हा या जोडप्याचा मृत्यू उघडकीस आला. दोन्ही फोनही बंद येत होते. यानंतर त्यांच्या मुलीने चेन्नईतील स्थानिक नातेवाईकांना याची माहिती दिली, त्यानंतर हे भयानक प्रकरण उलगडत गेले.
चेन्नई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे या जोडप्याच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजसह अनेक महत्त्वाचे पुरावे आहेत, ज्यावरून हे सिद्ध होते की या दोघांनी या जोडप्याची हत्या केली. पोलिसांनी सर्व पुरावे ताब्यात घेतले आहेत. या जोडप्याचे मृतदेहही पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या जोडप्याने अलीकडेच स्थावर मालमत्तेचा सौदा केला होता, त्यानंतर त्यांच्या घरात 40 कोटी रुपये रोख होते, जे घरगुती नोकराच्या निदर्शनास आले. दोघांनी मिळून हे पैसे लुटण्याचा कट रचला आणि या कटाखाली दोघांनी या दाम्पत्याची हत्या केली.