नवी दिल्ली – देशात प्रेमी युगूल पळून जाऊन लग्न केल्याच्या अनेक घटना घडतात. त्यातील काही लग्नांना दोन्ही बाजूचे कुटुंबीय स्वीकारतात. परंतु अनेकांना असे करणे मान्य नसते. त्यामुळे मोठे वाद होऊन ऑनर किलिंगच्या घटना घडतात. आपल्या समाजातील हे भयानक वास्तव आता सलग पहायला मिळत आहे. त्याच साखळीची कडी म्हणून खालील घटनेला पाहायला हवे. कारण एका प्रकरणात युवतीच्या कुटुंबीयांनी युवकासोबत अमानवीय कृत्य केले आहे. ते पाहून आपला समाज कुठल्या पातळीवर चालला आहे हे दिसून येते.
कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न केल्याने नाराज युवतीच्या कुटुंबीयांनी युवकाचे अपहरण करून त्याला येथील राजौरी गार्डन परिसरात मारहाण करण्याची घटना घडली आहे. युवकाचे गुप्तांग कापून त्याला एका परिसरात फेकून देऊन आरोपी फरारी झाले. बुधवारी रात्री उशिरा पादचार्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
युवकाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. राजौरी गार्डन पोलिसांनी युवकाच्या जबाबावरून अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपींच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
२२ वर्षीय पीडित युवक रघुवीर नगर येथील रहिवासी आहे. त्याचे सागरपूर येथे राहणार्या २० वर्षीय युवतीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुटुंबीयांनी नकार दिला. युवक आणि युवतीने २१ डिसेंबरला पळून जाऊन जयपूरला पोहोचले. तिथे दोघांनीही एका मंदिरात लग्न केले. लग्न केल्यानंतर २२ डिसेंबरला दोघे दिल्लीत पोहोचले. ते राजौरी गार्डन परिसरात थांबले होते. युवतीच्या कुटुंबीयांना ही गोष्ट समजली.
राजौरी गार्डन येथे पोहोचून युवतीच्या कुटुंबीय दोघांनाही सागरपूर येथे घेऊन गेले. तिथे युवकासोबत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंतर युवकाला दुसऱ्या ठिकाणी नेऊन धारदार हत्याराने त्याचे गुप्तांग कापले. त्यानंतर युवकाला सागरपूरच्या एका जंगलात फेकून देण्यात आले.