जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालय, जळगाव यांचेमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात राबविला जातो.
या योजनेमध्ये जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालय, जळगांव यांच्याकडुन उद्योग निरीक्षक/औद्योगिक पर्यवेक्षक यांची तालुक्यांना नेमणुक केलेली असुन संबंधीत कर्मचारी योजने अंतर्गत नेमुन दिलेले कामे पार पडत असतात. या योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीमार्फत थेट व्यवहार अथवा दलाली करण्याचा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
१३ मे २०२५ रोजी डॉ. मंगलसिंग परदेशी, रा. पाचोरा यांनी श्री. संदीप निकम (मोबाइल क्रमांक ९०४९९५२५५४) या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने आर्थिक मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
या व्यक्तीची नेमणूक जिल्हा उद्योग केंद्राशी किंवा खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. नागरिकांनी सदर व्यक्तीपासून सावध राहावे व कोणत्याही आर्थिक व्यवहारास बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी थेट जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.