इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लहान मुले असो की तरुण , यांच्या समूहामध्ये मित्रा मित्रांमध्ये छोटी मोठी भांडणे होतच असतात. परंतु ती लगेच मिटतात देखील परंतु एखादे भांडण विकोपाला गेले तर त्यातून एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. कारण राग हा वाईट असून रागाच्या भरात कोणी काहीही करू शकतो, परंतु एखाद्या लहान मुलाने जर आपल्या मित्राच मित्राला रागाच्या भरात पेटवून दिले तर ! ही बाब निश्चितच धक्कादायक आणि भयानक म्हणावी लागेल. अशीच घटना राजस्थान मध्ये घडली
खेळत असताना झालेल्या वादातून एका 7 वर्षांच्या मुलाने आपल्या 14 वर्षांच्या मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. जवळपास एक महिना जगण्यासाठी मृत्यूशी झुंजत असताना, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना कोटा येथील उद्योग नगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव विशाल (वय 14) असे आहे. तो आपल्या वडिलांसोबत भाजी-पाल्याच्या दुकानावर बसत होता. विशालने या पूर्वीच शिक्षण सोडले होते. त्या दिवशी त्याने वडिलांसोबत भाजीपाला खरेदी करून दुकानात आणला. यानंतर त्याचे वडील दुकानावरच थांबले आणि तो घरी गेला. यानंतर काही वेळाने विशाल शेजारी राहणाऱ्या आपल्या 7 वर्षाच्या मित्रासोबत खेळू लागला. याचदरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले.
परंतु या दोघांमध्ये झालेले भांडण त्यांच्या कुटुंबीयांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यांचे भांडण आणखीनच वाढत गेले. यानंतर आरोपी मुलाने त्याच्या वडिलांच्या रक्षातून डिझेलने भरलेली बाटली आणली आणि ते विशालवर शिंपडून लगेचच आग लावली. या घटनेत विशाल 50 टक्के भाजला होता. यानंतर, त्याला एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आधी मध्य प्रदेशातील श्योपूर या गावात आजी-आजोबांसोबत राहत होता. त्याचे वडील कोटा येथे रिक्षा चालवतात. महिनाभरापूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोटा येथे आणले होते. येथे आल्यानंतर त्याची शेजारी राहणाऱ्या विशालसोबत मैत्री झाली होती. त्या मैत्रीतून किरकोळ भांडण घडले आणि ही दुर्घटना घडली. आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नियमाप्रमाणे चौकशी करून कायदयाच्या तरतुदीनुसारच मुलावर कारवाई केली जाईल.
crime 7 year old boy fire burn friend diesel rajasthan police