इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तामिळनाडूमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. गेडीलाम नदीत सात जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुडालोर जिल्ह्यात पानसुट्टी गावाजवळ गेडीलाम नदी आहे. या नदीत चार अल्पवयीन मुले पोहण्यासाठी गेली होती. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले पाण्यात बुडू लागली. त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी तिघे जण धावून गेले. परंतु तेही त्यात बुडाले. त्यामुळे या दुर्घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यपालांनी देखील या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, नदी पात्रालगत धोकादायक ठिकाणी फलक लावण्याचे निर्देश राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. तसेच पावसाळ्यात नदीकाठच्या गावातील नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातही घटना
अशाच प्रकारच्या घटना काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात देखील घडल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही नदी किंवा समुद्रात जाताना पाण्याचा अंदाज घेणे गरजेचे असते. शक्यतो खोल पाण्यात उतरू नये असे वारंवार सांगण्यात येते. काही दिवसापूर्वीच पुणे नजिक वडगाव मावळ नायगाव या गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून आई व मुलाचा मृत्यू झाला आहे. हे दोघे कामशेत येथे राहत होते. दुसऱ्या एका दुर्घटनेत २ जून रोजी नदीत बुडून मायलेकीसह तिघींचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. कपडे धुण्यासाठी काही महिला नदीवर गेल्या होत्या. मात्र यातील चौघी नदीत बुडाल्या. त्यानंतर एकीला वाचवण्यात यश आलं, मात्र तिघींनी आपला जीव गमावला. ही घटना गेवराईत तालुक्यात मिरगाव मध्ये घडली.