इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसात तरुणी आणि महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनीच बेदम मारहाण करीत ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढे करुन हा निर्दयी बाप थांबला नाही तर मुलीचा मृतदेह शेतात नेऊन तो जाळण्याचाही प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कोठी गावातील कस्तुरबा गांधी निवासी कन्या शाळेत ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. या विद्यार्थीनीला घरात बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर मृतदेह जवळच्या शेतात नेऊन जाळण्यात आला. काही ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलीस पोहोचले. आग विझवल्यानंतर मुलीचा जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुलीचे वडील व कुटुंबीय घर सोडून फरार झाले आहेत. हे प्रकरण संशयास्पद असल्याने पोलीस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गावकऱ्यांनी ही मुलगी गावातीलच रहिवासी असल्याची ओळख पटवली. कस्तुरबा गांधी निवासी शाळेची विद्यार्थिनी होळीच्या सुट्टीत गावात आली होती, असेही गावकऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनोज कुमार पांडे यांनी सांगितले की, मुलीच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. १५ वर्षीय तरुणीने फोनवर बोलल्याने घरात वाद झाला. वडिलांनी आपल्या मुलीला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे घटना लपवण्यासाठी नातेवाईकांनी सोमवारी रात्री गावापासून दूर शेतात मृतदेह जाळला.
आग वाढत असल्याचे पाहून एका गावकऱ्याने संशयाच्या आधारे पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच आरोपीच्या कुटुंबीयांनीही तेथून पळ काढला. पोलिसांनी आग विझवून अर्धा जळालेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. या ऑनर किलिंग प्रकरणात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गावात दिवसभर पोलीस तैनात असल्याने शांतता होती.