इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
कोणताही सामाजिक कार्यकर्ता म्हटले की, यांनी समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे असे अपेक्षित असते, किंबहुना समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला सामाजिक कार्यकर्ता असे म्हटले जाते. परंतु काही वेळा सामाजिक कार्याचे नावाखाली एखाद्या व्यक्तीकडून गैरप्रकार घडतात, तेव्हा ते सामाजिक कार्य न ठरता समाज विघातक कार्य ठरते. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. आसाममध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली असून यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
आसाम मधील कथित प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता आणि पद्मश्री पुरस्कार विजेता उद्धव कुमार भराली याला शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गुरुवारी गुवाहाटी उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भराली याने आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयासमोर शरणागती पत्करली, कारण तो एका कटाचा बळी ठरला होता, असे त्याचे म्हणणे आहे. न्यायालयाने भरालीला सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, भारलीचे वकील ए.एम. बोरा यांनी सांगितले की भारली यांच्याकडे १५० हून अधिक अनाथ मुले आणि निराधार महिला आहेत, मात्र लखीमपूरच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अनिल बोरा यांनी त्यांना खोट्या प्रकरणात गोवले आहे. खरे तर बालकल्याण समितीच्या विनंतीवरून निराधार महिलांसाठी निवारागृह चालवणाऱ्या भराली यांनी दोन अनाथ मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली. या दोन मुली सप्टेंबर २०२० पासून भरालीच्या संरक्षणात होत्या.