नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल वरून सोशल मिडीयाचा चांगल्याप्रकारे वापर होतो, तसाच वाईट गोष्टीसाठी देखील वापर करण्यात येतो. त्यामुळे अलीकडच्या काळात सायबर क्राईमचे प्रकार वाढले आहेत. काही विकृत मनोवृत्तीचे तरूण सोशल मीडिया वरून तरुणी आणि अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करतात असाच प्रकार दिल्ली महानगरात केल्याने खळबळ उडाली आहे.
मैत्री करण्याची ऑफर नाकारली म्हणून मुलींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका तरुणाला द्वारका पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने दीडशेहून अधिक मुलींना टार्गेट केले आहे. सोशल मीडियावर मुलींचे नंबर कसे मिळवायचे हे या आरोपीने यूट्यूबवरून शोधले होते.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त विक्रम सिंह यांनी सांगितले की, सचिन कुमार (३०) असे आरोपीचे नाव असून तो मूळ हरियाणाचा रहिवासी आहे. तो एका डेअरीमध्ये काम करतो आणि फक्त इयत्ता पाचवीपर्यंत शिकला आहे. दरम्यान, एका पीडित मुलीने द्वारका जिल्ह्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती की, तिला एकदा सकाळच्या वेळी एका अज्ञात व्हर्च्युअल व्हॉट्सअॅप नंबरवरून मैत्रीचा संदेश आला होता. मात्र तिने विवाहित असल्याचे सांगून तो नंबर ब्लॉक केला.
त्यानंतर सायंकाळी पुन्हा त्या पीडितेला दुसऱ्या अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर पुन्हा मैत्री करण्याची ऑफर आली. सोबतच व्हर्च्युअल व्हॉट्सअॅप नंबरवरून कॉल करण्यात आले. परंतु पीडितेने ही ऑफर नाकारली. यानंतर पीडितेच्या फोटोशी छेडछाड करून अश्लील केले. तसेच जर तिने मैत्री केली नाही तर हे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करेन, अशी धमकी देखील आरोपीने दिली.
तेव्हा पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने विनयभंगाचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले. तपासात पोलीस पथकाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट आणि व्हर्च्युअल नंबर शोधले. आयडी अॅड्रेस, मोबाइल नंबर आणि आयएमईआयवर तपास केंद्रित करून पोलिसांनी त्याला शाहबाद डेअरी परिसरातून अटक केली.