इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क –
बिहार राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्या, दरोडे, हाणामारी, खून, बलात्कार यासारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याच्या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटणा शहरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सराफा दुकानात चार दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पडला.
बेकरगंज येथील एस.एस. ज्वेलर्स दुकानात दागिन्यांसह गुन्हेगारांनी ३५ किलो सोन्यासह सुमारे १२ कोटींहून अधिक किमतीचा ऐवज तसेच सुमारे १३ लाख रुपयांची रोकड लुटली. यावेळी दरोड्याला विरोध केल्याने दुकानदाराचा मुलगा यशराज याच्यावरही दरोडेखोरांनी गोळीबार केला. मात्र त्यात तो थोडक्यात बचावला. सुमारे पंधरा मिनिटांत लुटलेला माल घेऊन गुन्हेगार पळून जाऊ लागले. दरम्यान, जमावाने एका दरोडेखोराला पकडले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
जेहानाबाद येथील धुंद साधू असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. दरोडेखोरांकडून बॅगेत लुटलेले काही सोने, एक पिस्तूल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरोड्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या सराफा व्यापाऱ्यांनी चक्का जाम करून रस्ता बंद केला. तसेच संतप्त व्यावसायिकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, या मोठ्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबत दुकानदार संजीव कुमार यांच्या म्हणण्यानुसार, चार गुन्हेगार ग्राहक म्हणून दुकानात घुसले. यानंतर दरोडेखोरांनी सोन्याचे कानातले दागिने दाखवण्यास सांगितले.
त्याच वेळी अचानक गुन्हेगारांनी पिस्तुल काढून सर्व दागिने काढून घेण्यास सुरुवात केली. त्याच वेळी दुकानदाराच्या मोठ्या मुलाने विरोध केला असता, गुन्हेगारांनी त्याच्यावर एक राऊंड गोळीबार केला. गोळीबार पाहून तेथे उपस्थित दुकानदार व एक ग्राहक, कामगारासह आठ जण बाहेर पळले. यानंतर दरोडेखोरांनी आरामात संपूर्ण दुकान रिकामे केले. दरोडा टाकल्यानंतर पोलिसांना कोणीही माहिती देऊ नये म्हणून, धमकी देत गुन्हेगारांनी दुकानमालक व काही कर्मचाऱ्यांचे मोबाईलही काढून घेतले. मोबाईलसाठी गुन्हेगारांनी दुकानात उपस्थित काही ग्राहकांचे खिसेही तपासले. परंतु त्याच वेळी बाहेर लपलेल्या काही तरुणांनी एका दरोडेखोराला शिताफीने पकडले. दरम्यान या टोळीची माहिती पोलिसांना मिळाली आमचे पथक फरार गुन्हेगारांच्या शोधात छापे टाकत आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्पष्ट केले.
मात्र दिवसाढवळ्या सोन्या-चांदीच्या दुकानांवर दरोडे पडत असल्याने पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, तसेच जोपर्यंत पोलिस लुटलेले सोने-चांदी परत मिळवत नाहीत, तोपर्यंत बकरगंजमधील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून दागिने व्यावसायिकांना सुरक्षा द्यावी, अशी आमची पोलिस प्रशासनाकडे मागणी आहे, असे सराफा असोसिएशनने म्हटले आहे.