इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे 4 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करुन तिला 4 लाख ८० हजार रुपयांना एका सिव्हिल इंजिनिअरला विकण्यात आले. मुंबई पोलिस दलाच्या 2 जवानांनी या मुलीची सुटका केली असून अपहरण केल्याप्रकरणी 11 जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, इब्राहिम शेख याने एका नवजात अर्भकाचे अपहरण केले होते. अन्वरी अब्दुल शेख असे या महिलेच्या तक्रारीनंतर याप्रकरणी नवजात अर्भकाचे अपहरण आणि तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक माहितीच्या आधारे 32 वर्षीय इब्राहिमला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीच्या आधारे सायन, धारावी, मालाड जोगेश्वरी, नागपाडा, कल्याण आणि ठाणे येथे छापे टाकले. यावेळी 2 महिला आणि 4 तरुणांना अटक करण्यात आली आहे.
चौकशीत असे आढळून आले की, त्यांनी या मुलीला तामिळनाडूतील एका व्यक्तीला 4.8 लाख रुपयांना विकले. त्यानंतर 2 टीम त्या राज्यात पाठवण्यात आल्या. तेथे चार दिवस या पथकाने तीन जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबविली. यानंतर मुंबई पोलिसांनी कोईम्बतूर येथून एक महिला आणि चार तरुणांना अटक केली. या मुलीची विक्री तामिळनाडूतील सेल्वनपट्टी येथे राहणारे सिव्हिल इंजिनियर आनंद कुमार नागराजन यांना करण्यात आली. इब्राहिम शेख हा मुलीच्या आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. इब्राहिम शेख याने आपणच मुलाचे वडील असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आम्ही डीएनए चाचणी घेत आहोत. मुलीची आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती, मात्र तिचा अद्याप काहीही पत्ता लागला नाही, असेही पोलीसांनी सांगितले.