नाशिक : शहरात शस्त्रबंदी आदेशाचे राजरोसपणे उलंघन होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घटनांमध्ये दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मुंबईनाका आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुधाकर निवृत्ती जाधव (४० रा.शनिचौक,बजरंगवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.२३) आपल्या घराजवळ उभे असतांना उमेश रोहिदास जाधव उर्फ गोटू आणि चिनू नामक तरूणांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेली शिवीगाळ करू नका असे म्हटल्याने संशयीतांपैकी एकाने पकडून ठेवले तर दुस-याने धारदार शस्त्राने वार केल्याचे म्हटले आहे. या घटनेत जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेवर पोटावर आणि पाठीवर वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी उमेश जाधव यास बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. दुसरी घटना जुने नाशिक भागातील गजराज चौकात घडली. या घटनेत उद्देश उर्फ मुन्ना कैलास कुंभकर्ण (१९ रा.गोदावरी अपा.तळेनगर रामवाडी) हा युवक जखमी झाला. कुंभकर्ण रविवारी (दि.२२) रात्री गजराज चौकात गेला होता. यावेळी रोहित वसंत डोके आणि आकाश वसंत डोके (रा.दोघे काशीमाळी मंगल कार्यालयासमोर,तिगराणीया रोड) यांनी त्यास गाठून मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. याप्रसंगी रोहितने धारदार चाकूने हल्ला केला तर आकाशने फरचीचा तुकडा डोक्यात मारून जखमी केल्याचे तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.