नाशिक : संचारबंदी काळात रोखल्याने दोघांनी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेस धक्काबुक्की केल्याची घटना काट्या मारूती चौक परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. संशयीतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
तुषार सुब्रमण्यम पिलई (३० रा.भागवत गल्ली,देवळाली गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून पुजा अनिल कुमावत (२९ रा.तळेनगर,रामवाडी) या महिलेचा गुह्यातील संशयीतांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या कमल काशिनाथ ठाकरे या महिला हवालदाराने तक्रार दाखल केली आहे. ठाकरे आपल्या सहका-यांसमवेत सोमवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास काट्या मारूती चौकात नाकाबंदी करीत असतांना ही घटना घडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात संचारबंदी सुरू असून ठिकठिकाणी नाकाबंदी लावून पोलीसांकडून अत्यावश्यक काम वगळता घराबाहेर पडणा-यांना चाप बसविला जात आहे. ठाकरे या आपले कर्तव्य पार पाडत असतांना आडगाव नाक्याकडून येणा-या एमएच १५ एफजी ४७३९ वरील दुचाकीस पोलीसांनी अडविले. यावेळी ठाकरे यांनी विनाकारण फिरण्याबाबत जाब विचारला असता हा वाद झाला. संशयीत दुकलीने आम्ही कोठेही फिरू असे म्हणून ठाकरे यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जात व शासकिय गणवेशाची कॉलर पकडून धक्का बुक्की केली. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.