पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकारनगर येथील अमित वास्तू या गृहप्रकल्पातील ४ फ्लॅट संगनमत करून हडपण्याप्रकरणी अमित बिल्डर्सचे किशोर पाटे, रोहन पाटे, संकेत पाटे, पंकज छल्लानी, भागचंद छल्लानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विकलेले फ्लॅट हडपण्यासाठी बॅक डेटेड स्टॅम्पवर खाडाखोड करणे, बनावट करारनामा करून नाशिक येथील अशोका बिल्डकॉनचे भागीदार आशिष अशोक कटारिया यांना फसविण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी अमित वास्तूचे भागीदार किशोर पाटे, रोहन पाटे, संकेत पाटे, पंकज छल्लानी, भागचंद छल्लानी सामील झाल्याचे दिसून आले. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर या पाचही जणांविरुद्ध दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम चौकशी अहवालानुसार, हे ४ फ्लॅट कटारिया यांनी पंकज छल्लानी व भागचंद छल्लानी यांच्याकडून रजिस्टर खरेदीखत करून ठरलेले पूर्ण पेमेंट देऊन खरेदी केलेले होते. परंतु अमित बिल्डर्स व छल्लानी यांनी कटारिया यांच्या खरेदीनंतर बनाव रचला. खरेदी खताच्या नंतरचे स्टॅम्प पेपर घेऊन त्याची तारीख खरेदी खताच्या अगोदरची असल्याची खाडाखोड करून दाखवली. अमित बिल्डर्स व छल्लानी यांच्यातील खरेदीखत अगोदरच रद्द झाल्याचा करार करून नंतर रजिस्टर करण्यात आला. हवालदिल झालेले कटारिया यांनी RTI मध्ये ट्रेजरी कडून स्टॅम्प पेपरची माहिती मिळवली. त्यातून हा सर्व बनाव उघडकीस आला. त्यानंतर दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दिली. सदर गुन्ह्यातील आरोपी पंकज छल्लानी गेले दीड वर्षांपासून इतर अनेकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात M.P.I.D. कायद्याखाली तुरुंगात आहेत.
पाच वर्षापूर्वी पूर्ण पेमेंट घेऊनही अमित वस्तूने अद्यापही फ्लॅट अपूर्ण ठेऊन ताबा दिलेला नाही. रेरा न्यायालयातही आशिष कटारिया यांनी तक्रार दाखल करून न्याय मागितला आहे. परंतु गेली तीन वर्षे या प्रकरणी न्यायालय, पोलीस स्टेशन व रेरा कोर्टात तक्रार अर्ज करूनही फ्लॅट ताब्यात मिळालेला नाही. अमित बिल्डर्स हे पुण्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक आहेत. पोलिसांनी आता गुन्हा दाखल केल्याने आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.