नवी दिल्ली – लग्नाचे आमिष दाखवून देशभरात १०० हून अधिक महिलांना २५ कोटींहून अधिक रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाहदरा जिल्हा पोलिसांनी दोन नायजेरियन नागरिकांसह एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. लॉरेंस चिके नालुआ (३०), अयोटुंडे ओकुंडे ऊर्फ एलेक्स (३४) आणि दिल्लीतील रहिवासी दीपक दीक्षित (२९) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून सहा बँक डेबिड कार्ड, पाच स्वाइप मशीन, एक लॅपटॉप आणि एक टॅबलेट जप्त केला आहे. आरोपी मॅट्रोमोनियस वेबसाइटच्या माध्यमातून ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होते. आरोपी अशा पीडित महिलांना अडचणी सांगून त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून पैसे उकळत होते. त्यानंतर आरोपी आपले फोन नंबर बंद करून टाकत होते. आरोपींना अटक करून पोलिस तपास करत आहेत.
शाहदरा जिल्हा पोलिस उपायुक्त आर. सत्यसुंदरम म्हणाले, की जगतपुरी पोलिस ठाण्यात करिनाने (नाव बदलले आहे) फसवणुकीची तक्रार दिली होती. शादी डॉट कॉमवर त्यांनी लग्नासाठी नोंदणी केली होती. त्यादरम्यान एका युवकाने एनआयआर असल्याचे सांगून त्यांच्याशी संपर्क केला. दोघेही एकमेकांशी चॅट करू लागले. आरोपीने त्यांना व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरू केली. काही दिवसांनंतर आरोपीने अडचणीत असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून पैसे उकळले. त्यासाठी करिना यांनी आपले दागिन्यांवर कर्ज घेऊन आरोपीला १५ लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपीने पुन्हा पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना शंका आली. पीडितेने चौकशी केली असता आरोपीने मोबाईल बंद करून टाकला.
शहादरा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोपींनी जवळपास ३० ते ३५ खाते देशाच्या वेगवेळ्या राज्यात उघडल्याचे समोर आले. आरोपी रक्कम संबंधित खात्यात मागवून वेगवेळ्या एटीएममधून काढून घेत होते. काही ठिकाणी स्वाइप मशीनचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी दीर्घकाळ तपास केल्यानंतर दोन नायजेरियन आणि एका दिल्लीतील आरोपींना अटक केली. देशातील १०० हून अधिक महिलांना २५ कोटी रुपयांहून अधिक रुपयांनी गंडविल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.