इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रेल्वेच्या लिपिकाला 100 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. कर्मचारी निवृत्त झाला. घटनेला तब्बल 32 वर्षे लोटली. वयाच्या 89 व्या वर्षी या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला 15 हजारांचा दंड देखील ठोठावला आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हा निर्वाळा दिला वयाच्या कारणावरून वृद्धाला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला.
राम नारायण वर्मा असे दोषी निवृत्त रेल्वे लिपिकाचे नाव आहे. त्यांचे वय लक्षात घेऊन शिक्षा कमी करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण, सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश अजय विक्रम सिंह यांनी त्यांचा अर्ज फेटाळला. शिक्षा कमी केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे मत न्यायाधीश महोदयांनी व्यक्त केले.
गुन्हा गंभीर, शिक्षा भोगावीच लागेल
हे प्रकरण 32 वर्षे जुने आहे. सोबत जामिनावर सुटण्यापूर्वी दोन दिवस तुरुंगात काढले होते. त्यामुळे उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात जावे लागू नये, अशी विनंती वर्माने न्यायालयाला केली होती. न्यायालयाने रोखठोख भूमिका घेतली, या गंभीर प्रकरणात 2 दिवसांचा तुरुंगवास पुरेसा नाही. लाच घेणे गुन्हा आहे यामुळे आरोपीला एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सांगितले.
काय आहे नेमके प्रकरण?
1991 मध्ये उत्तर रेल्वेचे सेवानिवृत्त लोको ड्रायव्हर राम कुमार तिवारी यांनी या प्रकरणी सीबीआयकडे एफआयआर दाखल केला होता. तिवारी यांनी एफआयआरमध्ये आरोप केला होता की, त्यांची पेन्शन निश्चित करण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी आवश्यक होती. या कामासाठी राम नारायण वर्माने 150 रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर 100 रुपये मागितले होते. सीबीआयने लाचेच्या रकमेसह राम नारायण वर्माला रंगेहात अटक केली होती. सीबीआयने तपास पूर्ण केल्यानंतर राम नारायण वर्मा याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने राम नारायण वर्मा याच्यावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी आरोप निश्चित केले होते.
Crime 100 Rs Bribe after 32 Years Court Verdict