इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात काही माणसांमध्ये गुन्हेगारी वृत्ती इतकी वाढली आहे की, कौटुंबिक नात्यांमध्ये देखील संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती काही वेळा निर्माण होते. याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला.
अवघ्या एक महिन्यांच्या नातीला चक्क आजोबानेच आपल्या मैत्रिणीला विकल्याचा आरोप आहे. ही लाजिरवाणी घटना बिजनौरमधील आहे. या वृद्ध व्यक्तीने आपल्या एका महिन्याच्या नातीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिला दिल्लीतील मैत्रिणीला विकले. दिल्लीतील ही महिला मुलीसह बिहारला पळून गेल्याचे सांगितले जात असून पोलीस दोघांचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजनौरच्या मोहल्ला मध्ये 1 महिन्याची मुलगी अक्सा तिची आई मुमताजसोबत व्हरांड्यात झोपली होती. रात्री मुमताजने डोळे उघडले तेव्हा तिला अक्सा आपल्या जवळ नसल्याचे दिसून आले. घरच्यांनी अक्साचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती सापडली नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशी केली असता अक्साचे आजोबा जफरने अक्साचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जफरला नगीना बसस्थानकावरून अटक केली.
संशय्त आरोपी जफर दिल्लीच्या राणी गार्डन कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या शेजारी एक महिला राहत होती, त्याचे या महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र या महिलेला मूल नसल्यामुळे तिने जफरला मूल आणण्यास सांगितले होते. त्या स्त्रीच्या प्रेमात वेडे होऊन जफरने स्वतःची नात अक्सा हिला तिच्या हवाली केले.
जफरने आपल्या नातीला दहा हजार रुपयांना विकले. ती महिला मुलीला घेऊन पतीसह बिहारला गेल्याचे सांगितले जात आहे. पोलिस अक्सासह त्या महिलेचा कसून शोध घेत आहेत. यासाठीच बिहार पोलिसांशी त्यांनी संपर्क साधला आहे.