नाशिक : मृत व्यक्ती जीवंत असल्याचे भासवून मुखत्यार पत्रास बनावट घोषणापत्र जोडून एकाने परस्पर खरेदीखत केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सह. दुय्यम निबंधकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकाविरूध्द शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुपेंद्र शांतीलाल शहा (६२ रा.शरणपूररोड) असे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. सह. दुय्यम निरीक्षक बाळासाहेब घोंगडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केले आहे. संशयीताने ७ जून २०१८ रोजी दस्त क्रमांक ४४४७ – २०१८ या दस्ताची सह. दुय्यम निबंधक वर्ग २ नाशिक क्रमांक ५ या कार्यालयात खरेदीखत नोंदणी केली. दस्त लिहून देणा-या संशयीताने कुल मुख्त्यारपत्राच्या आधारे खरेदीखत नोंदणी करतांना राजेश सराफ यांचे मयत वडिल चिरंजीलाल सराफ हे मयत असतांनाही संशयीताने मुख्त्यारपत्रातील कोणतीही व्यक्ती मृत नसल्याचे खोटे घोषणापत्र जोडून खरेदीखताच्या दस्ताची नोंदणी केल्याचे म्हटले आहे. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या चौकशी नंतर शासनाची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून अधिक तपास निरीक्षक आहिरे करीत आहेत.