इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला झटका देताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यासाठीची याचिका फेटाळून लावली. मात्र त्याच्या वरील काही कलमे रद्द करून त्याला काहीसा दिलासा देण्यात आला आहे. आपले सहकारी क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि युझवेंद्र चहल यांच्यासोबत इंस्टाग्रामवर व्हिडिओ चॅटिंग करताना, युवराजने अनुसूचित जाती समाजाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हांसी येथील दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवराजविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, तो फेटाळण्यासाठी युवराजने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अमोल रतन सिंह यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार युवराज यांच्यावरील या कायद्यान्वये खटला सुरू असला तरी त्यात समाविष्ट असलेले कलम १५३ अ काढून टाकण्यात आले आहे. युवराजने हांसी शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने आज आदेश देऊन अंशत: फेटाळली. या खटल्यातील तक्रारदार रजत कलसन यांचे वकील अर्जुन शेओरन म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार युवराजविरुद्ध खटला चालणार आहे, परंतु त्यातून काही कलम हटवण्यात आले आहे. मात्र युवराजचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. आता या प्रकरणी युवराजवर हिसार येथील अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात खटला चालवला जाणार असून प्रत्येक हजेरीवेळी त्याला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. याआधी, पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने युवराजच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात आधीच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, तसेच तो हंसी पोलिसांच्या तपासात सामील झाला होता. या प्रकरणी हांसी पोलिसांनी युवराजला रीतसर अटक करून अंतरिम जामिनावर सोडले आहे. हंसी पोलीस आता युवराजविरुद्ध हिसारच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत.