मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंभीरविरुद्धच्या वादानंतर बीसीसीआयने सामन्याच्या शंभर टक्के दंड ठोठावल्याने विराट कोहली चांगलाच संतापला आहे. याच संतापात त्याने बीसीसीआयला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच मला शंभर टक्के दंड ठोठावण्याएवढे माझे काय चुकले, असा सवालही त्याने केला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक रंगतदार सामने झाले. काही सामन्यांनी तर ह्रदयाचे ठोकेही चुकवले. पण सर्वांत हिट ठरलेला एकच सामना होता आणि तो म्हणजे कोहली आणि गंभीर यांच्यातला. आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्यानंतर या दोघांमध्ये मैदानावरच जुंपली. एकमेकांवर हात उचलले नसले तरीही दोघांचीही आक्रमकता बघून त्याची तीव्रता लक्षात येत होती.
लखनौने आरसीबीला त्यांच्या मैदानावर पराभूत केले होते. याचा बदला आरसीबीने लखनौला त्यांच्या होमग्राऊंडवर पराभूत करून घेतला. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच विराट कोहली आक्रमक होता. त्यामुळे सामना सुरू असतानाच सर्वांत पहिले त्याचा वाद लखनौच्या नवीन-उल हक याच्यासोबत झाला. हा वाद अमित मिश्राने सोडवला. तर सामना संपल्यावर गौतम गंभीरसोबत त्याचे वाजले. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आले की काय, असे वाटत होते. या दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले याबद्दल बरेच अंदाज लावण्यात आले. पण आपण काहीही चुकीचे केलेले नाही, असा दावा विराटने केला आहे.
पत्रातून नाराजी
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना सामन्याच्या शंभर टक्के दंड ठोठावण्यात आला. तर नवीन उल हक याला ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर विराटने बीसीसीआयला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. ‘सामन्याच्या शंभर टक्के दंड ठोठावण्यात यावा, अशी कोणती चुक माझ्या हातून झाली आहे?’ असा सवाल विराटने केला आहे. अर्थात हा दंड विराटला भरायचा नसून त्याच्या संघाला भरायचा आहे. पण तरीही त्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
Cricketer Virat Kohli Letter to BCCI Controversy