मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आणि गेल्या काही वर्षांत त्याचा दर्जा घसरल्यानंतरही देशातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. सल्लागार फर्म डफ आणि फेल्प्सच्या अहवालानुसार, सध्या विराट देशातील मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी आहे. मात्र, त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये २२ टक्क्यांनी घट झाली आहे. असे असले तरी कोहलीने सलग पाचव्या वर्षी आपले स्थान कायम राखले आहे.
सेलेब्रिटींची ब्रँड लिस्ट तयार करणाऱ्या कंपनी डफ अँड फेल्प्सच्या एमडीच्या म्हणण्यानुसार, “या यादीमध्ये चित्रपट उद्योगातील व्यक्तींचा दबदबा आहे. पण त्यात अनेक खेळाडूंचे वर्चस्वही आहे. अशा खेळाडूंमध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि पीव्ही सिंधू इत्यादींचा समावेश आहे. मंगळवारी (२९ मार्च २०२२) जारी करण्यात आलेल्या या अहवालात असे सांगण्यात आले की, २०२१ मध्ये विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू १८.५७ दशलक्ष डॉलर इतकी आहे. तर २०२० मध्ये हा आकडा २३.७७ दशलक्ष डॉलर होती.
या यादीत भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारानंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू अंदाजे १५.८३ डॉलर दशलक्ष आहे. रणवीर सिंगने या कालावधीत सुपरस्टार अक्षय कुमारला मागे टाकले आहे. अक्षय कुमार आता १३.६९ दशलक्ष डॉलर ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानावर आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू ६.८१ करोड डॉलर आहे. तसेच महिला सेलिब्रिटींमध्येही ती आघाडीवर आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण ५.१६ करोड ब्रँड व्हॅल्यूसह यादीत सातव्या स्थानावर आहे. ही यादी तयार करणाऱ्या फर्मचे एमडी अविरल जैन म्हणाले की, या यादीत चित्रपटसृष्टीशी संबंधित चेहऱ्यांचे वर्चस्व असले तरी त्यात विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि पीव्ही सिंधू यांसारख्या खेळाडूंचाही दमदार उपस्थिती आहे. रणवीर, आलिया आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी २०२१ मध्ये नोंदवलेल्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढीच्या बाबतीत पुढे आहेत.
आशिया-पॅसिफिक प्रदेशातील फर्मच्या मूल्यांकन सल्लागार सेवांचे प्रमुख वरुण गुप्ता यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, “व्यवसाय आणि ब्रँड्सनी या वर्षीही पारंपरिक प्लॅटफॉर्मसह ब्रँड प्रमोशनसाठी सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. टेलिव्हिजन हे अजूनही जाहिरातींचे सर्वात मोठे स्त्रोत आहे, परंतु डिजिटल मीडिया वेगाने वाढत आहे आणि २०२३ मध्ये जाहिरातींच्या खर्चाच्या बाबतीत आघाडीवर आहे.”