इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज एक मोठी घोषणा करुन खळबळ उडवून दिली आहे. विराटने सोशल मिडियावर एक पोस्ट टाकून मोठा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेनंतर सर्व क्रिकेट रसिकांना मोठाच धक्का बसला आहे. एकदिवसीय आणि टी२० सामन्यांनंतर आता कसोटीतील कर्णधारपदही सोडत असल्याचे विराटने जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक आयोग (बीसीसीआय) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. विराटने जाहीर केलेला कर्णधारपद त्यागण्याचा निर्णय हा त्याचाच परिपाक असल्याचे बोलले जात आहे. टी२० सामन्यांचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट आणि बीसीसीआय यांच्यात मोठा वाद सुरू झाला आहे.
भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. भारताने नुकतीच कसोटी मालिका गमावली आहे. भारताने ही मालिका २-१ने गमावली आहे. भारताने पहिला सामना जिंकला पण नंतरचे दोन्ही सामने गमावले. त्यानंतर आता विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भारतीय संघाचे कसोटीचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीने सोडल्यानंतर विराट कोहलीकडे नेतृत्व आले. विराटने अनेक सामने जिंकून दिले. अनेक विक्रमही भारताच्या आणि त्याच्या नावावर नोंदले गेले आहेत. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणूनही विराटकडे पाहिले जाते. त्यात आता त्याने कर्णधारपद त्यागण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विराटने सोशल मिडियात केलेली पोस्ट अशी
https://twitter.com/imVkohli/status/1482340422987169794?s=20