मुंबई – गेल्या काही वर्षांपासून देशभरात ऑनलाइन व्यवहार सुरू झाले आहेत. त्यातच या काळात प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार करण्याऐवजी वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाइन बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कोरोना संसर्गाचा धोका टाळला जात असला तरी ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूकचे म्हणजेच सायबर क्राईमचे प्रकार वाढले आहेत.
विशेष म्हणजे हे सायबर गुन्हेगार कोणालाही फसवू शकतात, या संदर्भात रिझर्व्ह बँकेसह अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी देशभरातील सर्वच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परंतु सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने अनेकांची आर्थिक फसवणूक करून ग्राहकांच्या बँक खात्यात पैसे लंपास करतात. विशेष म्हणजे अशा प्रकारचा केवळ सर्वसामान्य ग्राहक नव्हे तर अनेक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती देखील सायबर गुन्हेगारीला बळी पडल्याचे दिसून येते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. या सायबर ठगांनी त्यांची एक लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बँक अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने कांबळीला फोन करून लिंक पाठवली. कांबळीने ती लिंक उघडल्यानंतर लगेचच त्याच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी देखील या संदर्भात विशेष काळजी घ्यावी असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.