इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेटपटू, बॉलीवूड कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्यवसायात गुंतवणूक करत असतात. याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आसपास पाहतोच. असाच एक क्रिकेटपटू आता शेफ झाला आहे. एवढंच नव्हे तर त्याने परदेशात स्वतःचे एक हॉटेलही सुरू केले आहे.
कोण आहे हा क्रिकेटपटू?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने शेफ म्हणून आपली नवी इनिंग सुरू केली आहे. नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये रैनाने एक रेस्टॉरंट सुरू केले आहे, जिथे तो देशी खाद्यपदार्थांची चव खवय्यांना देणार आहे. इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करून रैनाने त्याच्या नव्या व्यवसायाची माहिती दिली. क्रिकेट व्यतिरिक्त रैनाला वेगवगळे पदार्थ करून पाहण्याची आवड आहे. यापूर्वीही त्याने त्याचे कुकिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या नवीन इनिंगबद्दल अनेक दिग्गज खेळाडू आणि मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
सुरेश रैनाने म्हणतो की, “अॅमस्टरडॅममधील रैना इंडियन रेस्टॉरंटची ओळख करून देताना मला फारच आनंद होत आहे. या माझ्या नवीन व्यवसायामुळे मला माझी खाण्याची आणि दुसऱ्याला खायला घालण्याची आवड मी अधिक उत्तमरित्या जोपासू शकतो. हा माझ्यासाठी खूप विलक्षण अनुभव असणार आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही माझे खाण्याबद्दलचे प्रेम पाहिले आहे आणि माझ्या स्वयंपाकासंबंधीच्या साहसांचे कौतुकही केले आहे. भारताच्या विविध भागांतून अगदी अस्सल आणि चविष्ट पदार्थांचा स्वाद थेट युरोपमध्ये देणे हे माझे ध्येय आहे. याच पोस्टमध्ये तो पुढे म्हणतो, आम्ही एकत्र आज एक नवीन सुरुवात करतो आहोत. माझ्या साहसाला सुरुवात करत असताना या विलक्षण प्रवासात माझ्यासोबत सहभागी व्हा. वेगवेगळे रोमांचक अपडेट्स, तुमच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांची झलक चाखण्यासाठी तयार राहा.”
रैनाची कारकीर्द
३६ वर्षीय रैना हा वरच्या क्रमांकावर खेळायला येणार आक्रमक फलंदाज होता. त्याने भारतासाठी १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी२० सामने खेळले असून या सर्व प्रकारांमध्ये मिळून ७ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. रैनाने २०५ आयपीएल सामने खेळले आहेत आणि नाबाद शतकासह ५५०० हून अधिक धावा केल्या आहेत. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे.