इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्धीचे वलय असलेल्या लोकांना आपल्यासारखे त्रास नसतात, अशी अनेकांची समजूत असते. पण, अनेकदा ही समजूत खोटीच ठरताना दिसते. अनेक सेलिब्रिटीच्या कौटुंबिक आयुष्यातील अडचणी पाहताना हे खरंच आहे, हे दिसून येतं. तसं नसतं तर क्रिकेटपटू शिखर धवनला आपल्याच मुलाला भेटण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागला नसता.
शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. २०२१ पासून या नात्यात तणाव आहे. त्याही आधीपासून म्हणजे २०२० पासून हे दोघे वेगळे रहात आहेत. ऑगस्ट २०२० पासून धवन आपला मुलगा जोरावरला भेटलेला नाही. शेवटी या वादात आता न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने आयशाला तिच्या ९ वर्षांच्या मुलाला धवन आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात आणण्यास सांगितले आहे.
शिखर धवन ३ वर्षांनी मुलाला भेटणार
धवनसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोर्टाने आयशाला तिच्या ९ वर्षांच्या मुलाला भारतात आणण्यास सांगितले आहे.
सध्या आयेशा तिच्या मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहते. आयेशाने धवनच्या कुटुंबीयांशी मुलाच्या भेटीला घेतलेल्या आक्षेपावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने सांगितले की, शिखर धवनचे कुटुंब ऑगस्ट २०२० पासून मुलाला भेटलेले नाही. एकट्या आईचा मुलावर अधिकार नाही. शिखर धवनने आतापर्यंत एक चांगला पिता असल्याचे सिद्ध केले आहे, तर मुलाच्या कुटुंबीयांना भेटण्यास ती का आक्षेप घेत आहे. त्यांना फक्त आपल्या मुलाला बघायचे आहे आणि एकत्र भेटायचे आहे. न्यायालयाने आयेशा धवनला स्वत: मुलाला भारतात आणावे किंवा धवन कुटुंबाला भेटण्यासाठी विश्वासू व्यक्तीमार्फत पाठवावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिखर धवन मुलाची कस्टडी मागत नसून त्याला फक्त आपल्या मुलाला बघायचे आहे आणि भेटायचे आहे.
जोरावर आठवडाभर कुटुंबासोबत राहणार
२८ जून रोजी सकाळी १० वाजता मुलाचा ताबा दिल्लीतील धवन कुटुंबीयांकडे सोपवण्यात यावा. जर काही कारणास्तव आयेशासाठी हे शक्य नसेल तर न्यायालयाच्या आदेशानंतर ७२ तासांत कळवायचे आहे. तसे झाल्यास शिखर धवन स्वतः मुलाला ऑस्ट्रेलियातून घेऊन येईल. मुलाला भारतात येण्यासाठी व्हिसा किंवा आवश्यक मंजुरी मिळवण्याची जबाबदारी आयेशावर असेल. २७ जून रोजी जोरावर भारतात येईल आणि ४ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाला परत पाठवले जाईल अशी व्यवस्था करावी. या प्रवासाचा सर्व खर्च शिखर धवन उचलणार आहे.
Cricketer Shikhar Dhawan Family Court