इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीचा जादूगार शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटक्याने दोन दिवसांपूर्वी निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. शेन आणि त्याचे मित्र कोह समुई येथे एका खासगी बंगल्यात थांबले होते. त्याच्या निधनामुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेनच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. आता शेन वॉर्नच्या व्यवस्थापकाने तो मृत्यूपूर्वी काय करत होता याचा खुलासा केला आहे. शेन वॉर्नचे व्यवस्थापक जेम्स एर्स्किन यांनी फॉक्स क्रिकेटला या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, की शेन वॉर्नला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या व्यवसाय व्यवस्थापकांनी त्याला वाचवण्यासाठी वीस मिनिटे सीपीआर दिला. तेव्हा शेन ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान रावळपिंडी येथे सुरू असलेला कसोटी सामना टीव्हीवर पाहात होता. टीव्ही पाहताना तो अचानक बेशुद्ध झाला. शेन वॉर्न नंतर सायंकाळी पाच वाजता काही जणांना भेटणारही होता.
जेम्स एर्स्क्रिन यांनी अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे. वॉर्न याला शेवटच्या दोन तासांपूर्वी पाहण्यात आले होते. तो सुट्टी घालवण्यासाठी तसेच आराम करण्यासाठी थायलंड येथे गेला होता. आपले वजन कमी करण्यासाठी तो डाएट करत होता. शेन गेल्या दहा वर्षांपासून मद्यपान करत नव्हता. मृत्यूपूर्वी तो दारू पित नव्हता. तो अंमली पदार्थांचा द्वेष करत होता. शेन वॉर्नने २ जानेवारी १९९२ मध्ये भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात पदार्पण केले होते. २ जानेवारी २००७ रोजी त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. १९९३ मध्ये त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. वॉर्न याने १४५ कसोटी सामन्यात ७०८ आणि १९४ एकदिवसीय सामन्यात २९३ गडी टिपले आहेत. त्याने ३८ वेळा ५ गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. तर दहा वेळा दहा गडी बाद करण्याची किमयाही साधली आहे.