नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
इंडियन प्रिमीयर लिगने (आयपीएल) खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. खेड्यांमधून आलेले अनेक खेळाडू आज श्रीमंत झाले आहेत, ते आयपीएलमुळे. पण करार झाल्यानंतरही एखाद्या वर्षी काही कारणांनी आयपीएल खेळायला मिळाले नाही, तर पैसे मिळतात का? या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं आहे. आणि यंदा ऋषभ पंत आयपीएल खेळणार नसला तरीही त्याला सुद्धा पूर्ण पैसे मिळणार आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा ३० डिसेंबरला जबरदस्त अपघात झाला. त्यात त्याला बरीच दुखापत झाली असून अद्ययावत उपचारांसाठी अलीकडेच मुंबईला हलविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. पुढील वर्षभरात अनेक स्पर्धांना त्याला मुकावे लागणार आहे, हे तर आता स्पष्ट झाले आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या फायद्याची असलेली आयपीएलही त्याला खेळता येणार नाही. त्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पण कुणाला जर अशी चिंता असेल की ऋषभ पंतला आयपीएल न खेळल्यामुळे पैसे मिळणार नाहीत, तर त्यांनी काळजी करू नये. कारण त्याला कराराप्रमाणे पूर्ण पैसे मिळणार आहेत.
१६ कोटी मिळणार!
ऋषभ पंतला आयपीएलसाठी दिल्ली कॅपीटल्सने १६ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळला नाही तरी करारानुसार त्याला पूर्ण पैसे मिळतील. मात्र दिल्ली कॅपीटल्स नव्हे तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे पैसे देईल. यापूर्वी दीपक चहरला देखील चेन्नई संघाने कराराप्रमाणे १४ कोटी रुपये दिले होते.
नियम काय म्हणतो
आयपीएलपूर्वी एखादा करारबद्ध खेळाडू जखमी झाला किंवा त्याचा गंभीर अपघात झाला, तर बीसीसीआय विम्याअंतर्गत खेळाडूला पैसा देते. बोर्डाच्या केंद्रीय करारात जे खेळाडू समाविष्ट आहेत, त्यांना ही सुविधा मिळत असते. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयने आपल्या खेळाडूंच्या आर्थिक सुरक्षेसाठी सर्व सोयी करून ठेवल्या आहेत. त्याचाच लाभ आता ऋषभ पंतला होणार आहे.
Cricketer Rishabh Pant Accident Wont Play Will Get Crore Rupees
Sports IPL Delhi Capitals