मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू राहुल चाहर नऊ मार्च रोजी गोवा येथे फॅशन डिझायनर ईशानी जौहर सोबत विवाहबद्ध होणार आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांचा जयपूरमध्ये साखरपुडा झाला होता. दोघेही एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. या लग्नसोहळ्याला अनेक क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी राहुल चाहरचे कुटुंबीय गोव्याकडे रवाना झाले आहेत. पश्चिम गोव्यातील एका हॉटेलमध्ये मंगळवारपासून लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. आज सायंकाळी मेहंदीचा कार्यक्रम होईल. बुधवारी दुपारी हळद लावली जाईल आणि सायंकाळी वरात काढली जाईल. रात्री इतर विधी होतील. लग्नानंतर १२ मार्चला आग्रा येथे एका हॉटेलमध्ये स्वागत समारंभ होईल.
भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळ आहे. गोव्यात लग्नसमारंभासह आगरा येथे होणाऱ्या स्वागत समारंभाला अनेक खेळाडू आणि आयपीएल फ्रेंचाइजी संघाशी संबंधित दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राहुल चाहरचा चुलत भाऊ क्रिकेटपटू दीपक चाहर गोव्यात उपस्थित राहणार आहे. बावीस वर्षीय राहुल चाहर याने भारतासाठी आतापर्यंत एकमात्र एकदिवसीय सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने ५४ धावा देत ३ गडी बाद केले होते. २३ जुलै २०२१ रोजी त्याने श्रीलंकेविरुद्ध सामना खेळला होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली नाही. राहुलने भारतीय संघाकडून सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ७ गडी बाद केले आहेत. १५ धावा देत ३ गडी बाद केल्याची त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. २०१९ पासून तो आयपीएलही खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याने ४२ सामन्यात ४३ गडी बाद केले आहेत. २७ धावा देत चार गडी बाद केल्याची त्याची आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.