नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या प्रियांका घोडकेची देखील महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. माया सोनवणे व ईश्वरी सावकार ह्या दोन खेळाडूंच्या पाठोपाठ आता प्रियांका ची पण महाराष्ट्रातर्फे निवड झाली आहे . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी या तीघी आता महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
प्रियांका घोडके आघाडीची फलंदाज व ऑफ स्पिनर आहे. प्रियांकाने महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे, नोव्हेंबर २०१९ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतांना फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. २०१८-१९ च्या हंगामात ,टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते. तसेच महत्वाच्या सामन्यात अर्धशतके झळकाविली आहेत. प्रियांका ने देखील १९ व २३ वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघातही महाराष्ट्रतर्फे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच गेल्या ऑक्टोबरमध्ये डेहराडून येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील प्रियांका ने महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.
वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – १८ एप्रिल आंध्र , १९ एप्रिल केरळ , २१ एप्रिल मेघालय , २२ एप्रिल हैद्राबाद व २४ एप्रिल राजस्थान विरुद्ध.
प्रियांकाच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.