इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीम इंडियाचा वादग्रस्त फलंदाज पृथ्वी शॉला मुंबई पोलिसांनी दिलासा दिला आहे. सोशल मीडिया स्टार सपना गिलने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर विनयभंग तसेच मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी पूर्ण केली असून त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालानुसार दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. आता मुंबई पोलिसांनी पृथ्वी शॉला निर्दोष ठरवले.
सपना गिलने अंधेरी कोर्टात पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्याविरूद्ध जामीनपात्र गुन्ह्याखाली एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. सपना गिलने न्यायालयात जाण्यापूर्वी अंधेरी येथील एअरपोर्ट पोलीस ठाण्यात पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राविरूद्ध विनयभंगाची तक्रार केली. पबमधील सीसीटीव्हीमध्ये सपना गिल आणि तिचा मित्र शोबित ठाकूर हे मद्यपान करून नाचत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. ठाकूरला पृथ्वी शॉचा मोबाईलवर व्हिडिओ काढायचा होता. मात्र क्रिकेटपटू पृथ्वी शॉने त्याला व्हिडिओ काढण्यापासून रोखले. या सीसीटीव्ही फुटेजनुसार शॉ आणि इतरांनी सपना गिलचा विनयभंग केल्याचे आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पबमध्ये उपस्थित साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवले आहे. कोणीही गिलला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नसल्याचे या जबाबात साक्षीदारांनी सांगितले.
सपनाने केला पाठलाग
उलटपक्षी एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे सीसीटीव्ही पाहता हे लक्षात आले की, सपनाने हातात बेसबॉल बॅट घेऊन पृथ्वी शॉच्या कारचा पाठलाग केला. एवढेच नाही तर सीआयएसएफ अधिकाऱ्यांचे वक्तव्य पाहूनही सपना गिल चुकीचे ठरले.
पृथ्वी शॉवर कोणत्या कलमांखाली दाखल झाला होता गुन्हा?
भारतीय दंडविधान ३५४ : महिलेच्या विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला करणे.
भारतीय दंडविधान ५०९: महिलेचा विनभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दांचा प्रयोग करणे.
भारतीय दंडविधान ३२४: सपना गिलवर बॅटने हल्ला करण्याचा प्रयत्न करणे.