नवी दिल्ली :- भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच असेल तर प्रेक्षकांना ते जणू काही धर्मयुद्ध वाटते. याला कारण म्हणजे पाकिस्तान खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय खेळाडू असो भारत देश यांच्यावर नेहमीच आगपाखड करत आले आहेत. मग ते एकेकाळचे पाकचे कॅप्टन इम्रान खान असो की जावेद मियाँदाद. इतकेच नव्हे तर रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकचा तेज गोलंदाज शोएब अख्तरची देखील एका कार्यक्रमात जीभ घसरली. मात्र, त्याचा चांगलाच खरपूस समाचार हरभजन सिंगने घेतला. आमच्या देशाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे हरभजनने सुनावताच शोएबची बोलतीच बंद झाली.
भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग हा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ वर चांगलाच भडकला. कारण शोएब अख्तरने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्याची तसेच पैसे कमवण्याची संधी दिली जात नसल्याची तक्रार केली. यावर हरभजन सिंग संतापला आणि म्हणाला की, आमच्या राष्ट्रध्वजाचा आणि देशाचा अपमान आपण सहन करू शकत नाही, इतकेच नव्हे तर हरभजनने काश्मीरबाबत जोरदार वक्तव्य करणाऱ्या शाहिद आफ्रिदीवर निशाणा साधला आणि क्रिकेटपुरते मर्यादित राहण्याचा सल्ला दिला.
एका टीव्ही न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात, २४ ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषकात होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर हरभजन आणि शोएब हे चर्चा करत होते. पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये कमाई करण्याची संधी मिळत नसल्याचा उल्लेख शोएबने केला. ही तक्रार ऐकून हरभजन गंभीर झाला आणि म्हणाला की, तुम्ही पैसे कमवा, आम्हाला काही अडचण नाही. पण कोणताही क्रिकेटपटू कोणत्याही मुद्द्यावर उठतो आणि भारताची बदनामी करतो. तेव्हा समस्या उद्भवते. आमच्या ध्वजाची बदनामी करतो. त्यामुळे आम्हाला संताप येतो. कारण कोणीतरी मूर्ख माणूस उठून भारतावर असे डाग लावत म्हणतो की, काश्मीर आमचे आहे, किंवा ते आमुक तमुक आमचे आहे. पण भाऊ, या मुद्द्यांमध्ये जाण्याएवढा काही जणांचा दर्जा मोठा नाही. आम्ही क्रिकेटर आहोत, आम्हाला क्रिकेटर म्हणून ओळख राहू द्या, असे हरभजनने शोएबला जोरदार फटकारले.
हरभजनचा हा संताप पाहून शोएब अख्तर स्तब्ध झाला आणि काही तरी सारवासारव करण्याचा प्रयत्न करू लागला. काय होत आहे ते विचारू लागला. अख्तर म्हणाला की, मी हिंदूंचा द्वेष करत नाही, मला कोणत्याही जाती किंवा धर्माचा राग नाही. मला इतिहासात जायचे नाही. क्रिकेटवर आणि प्रेक्षकांवर माझा विश्वास आहे. असे म्हणत शोएबने सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला.