कानपूर – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा हंगामी कर्णधार अजिंक्य राहाणे याची खराब कामगिरीविषयी भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी कायम आहे. येथील ग्रीन पार्क मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा पहिला कसोटी क्रिकेट सामना ड्रॉ झाला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते. या सामन्यात तो अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. रहाणेने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात ३५ आणि दुसर्या डावात फक्त चार धावा केल्या. अजिंक्यच्या कामगिरीविषयी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वक्तव्य केले आहे.
या वर्षी १२ कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेची धावांची सरासरी २० हून कमी आहे. रहाणेच्या खराब कामगिरीविषयी द्रविड यांना विचारले असता ते म्हणाले, रहाणेच्या कामगिरीवरून जास्त चिंतीत होण्याची गरज नाही. अजिंक्यने जास्त धावा कराव्यात असे तुम्हाला वाटते यात गैर काहीच नाही. अजिंक्य हा एक प्रतिभासंपन्न खेळाडू आहे. त्याने भारतासाठी यापूर्वी चांगल्या धावा केल्या आहेत. कौशल्य आणि अनुभव असणार्यांपैकी तो एक खेळाडू आहे. खराब कामगिरी एका सामन्यात झाली आहे. हे त्यालासुद्धा ठाऊक आहे आणि हे आम्ही समजून घेतो.
मुंबईमध्ये होणार्या दुसर्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे रहाणेला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यासाठी सामनावीर श्रेयस अय्यरला बाहेर बसविले जाणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना द्रविड म्हणाले, पुढील सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंची अद्याप निवड झालेली नाही. हे फारच घाईचे ठरेल. आमचे लक्ष आजच्या सामन्याकडे होते. मुंबईला गेल्यावर परिस्थितीचा आढावा घेऊन खेळाडूंचा फिटनेस तपासणार आहोत. विराट कोहलीसुद्धा सोबत असेल. त्यामुळे आम्ही त्याच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत.