मनीष कुलकर्णी, मुंबई
दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट कसोटी संघाची निवड समितीने घोषणा केली. या निवडीमध्ये टी-ट्वेंटीनंतर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपविल्याने सर्वांनाच धक्का बसला. आता विराट कोहली याने एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा वर्तवली होती का, ही चर्चा सुरू झाली आहे. विराटने टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे टी-ट्वेंटीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. परंतु एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे त्याने म्हटले होते. मात्र काही महिन्यातच त्याला एकदिवसीय क्रिकेटच्या सामन्यांच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विराट कोहली कर्णधार असताना भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहचू शकला नव्हता. त्यानंतर विराटला एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपदही सोडवे लागते की काय अशी चर्चा सुरू झाली होती. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. परंतु संघाला कोणताही आयसीसी चषक आपल्या नावावर करता आला नाही. २०१७ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकात उपांत्य सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला होता. रोहित शर्माची एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदी निवड झाल्याची घोषणा होताच या मुद्दयावर चर्चा सुरू झाली आहे.
क्रिकट्रॅकरच्या वृत्तानुसार, विराटने एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्यास नकार दिला होता. तरीही रोहित शर्माला कर्णधार बनविण्यात आले. रोहितचा दर्जा भारतीय क्रिकेट संघात तिन्ही फॉरमॅटमध्ये वाढला आहे. रोहितची टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदी निवड झालीच आहे, शिवाय त्याला कसोटी सामन्यांमध्ये उपकर्णधारही बनविण्यात आले आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणेकडे कसोटीचे उपकर्णधारपद होते. सलग खराब कामगिरीमुळे रहाणेला हटविण्यात आले. यापूर्वी टी-२०चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा स्वतः विराटने केली होती. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणाही स्वतः विराटने केली होती. परंतु या वेळी तसे काहीही झाले नाही. त्यामुळे चर्चेला वाव मिळाला आहे.
विराट भारतीय संघाचा कर्णधार असताना संघाने एकूण ९५ सामने खेळले आहेत. त्यापैकी ६५ सामन्यात विजय मिळवला आहे. तो सध्या भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माचे नेहमीच कौतुक होत आले आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. २०१८ मध्ये आशिया चषकात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. विराटच्या गैरहजेरीत २०१८ मध्ये रोहितने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते.