इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने हा पराक्रम केला. १११ धावांच्या लक्ष्य पूर्ण करताना रोहित शर्माने ५८ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार मारत नाबाद ७६ धावा केल्या. या ५ षटकारांसह त्याने वनडे क्रिकेटमधील २५० षटकारही पूर्ण केले. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आता चौथ्या क्रमांकावर आला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये आता रोहित शर्मासह पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी, वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या यांचा समावेश आहे. शाहिद आफ्रिदीने आतापर्यंत ३५१, ख्रिस गेल याने ३३१, सनथ जयसूर्याने २७०, रोहित शर्माने २५० तर एमएस धोनीने २२९ षटकार मारले आहेत.
ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाचा या विजयाचा हिरो जसप्रीत बुमराह हादेखील ठरला. ज्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ७.२ षटकात १९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/CricketFreakD/status/1547102897027964929?s=20&t=DxLu81VaeQuKS7WcOO8Y6A
बुमराहच्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने यजमानांना ११० धावांत गुंडाळण्यात यश मिळविले. भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील ही इंग्लंडची सर्वात कमी धावसंख्या आहे. १११ धावांचे लक्ष्य रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीने १८.४ षटकात विकेट न गमावता पूर्ण केले. रोहितशिवाय धवनने ३१ धावा केल्या. उत्कृष्ट कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना १४ जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
Cricket Rohit Sharma New Record 12 ball 58 runs ODI