मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या आशिया कप २०२३ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेचे आयोजन श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांमध्ये हायब्रिड पद्धतीने होत आहे. स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हायव्होल्टेज सामना आज होत आहे. हा सामना कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आशिया चषकाचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत होत आहेत. भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिल्यानंतर आशिया चषक परिषदेने ‘हायब्रिड मॉडेल’ स्वीकारले. टीम इंडिया आपले सामने श्रीलंकेत खेळणार आहे. आज, २ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होत आहे. तर १७ सप्टेंबरला महाअंतिम सामना पार पडणार आहे.
असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (व्हीसी), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिध्द कृष्णा
स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे झाला. श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झाला. भारतीय संघ आज कँडीमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळत आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरला त्याच मैदानावर भारताचा सामना नेपाळशी होत आहे.
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. यावेळी आशिया कप ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी संघांना त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्याची ही सुवर्णसंधी असेल. पीसीबीने तयार केलेल्या मूळ मॉडेलनुसार, पाकिस्तानने फक्त एका शहरात चार सामने आयोजित करायचे होते. तथापि, नवीन अध्यक्ष झका अश्रफ यांच्या नेतृत्वाखालील पीसीबी प्रशासनाने या महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर मुलतान हे दुसरे ठिकाण म्हणून जोडले गेले. मुलतानला फक्त सलामीच्या सामन्याचे यजमानपद मिळणार आहे, तर लाहोरमध्ये तीन सामने होणार आहेत. त्यात सुपर फोरच्या सामन्याचा समावेश आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक असे
तारीख… सामना… ठिकाण
३० ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान
३१ ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी
२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध भारत – कॅंडी
३ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी
५ सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका – लाहोर
सुपर-४ फेरी
६ सप्टेंबर A1 वि B2 लाहोर
९ सप्टेंबर B1 वि B2 कोलंबो
१० सप्टेंबर A1 वि A2 कोलंबो
१२ सप्टेंबर A2 v B1 कोलंबो
१४ सप्टेंबर A1 वि B1 कोलंबो
१५ सप्टेंबर A2 वि B2 कोलंबो
अंतिम सामना
१७ सप्टेंबर सुपर4 – 1 विरुद्ध 2 कोलंबो
बांगलादेश ३ सप्टेंबरला लाहोरमध्ये अफगाणिस्तानशी खेळणार आहे आणि त्यानंतर ५ सप्टेंबरला श्रीलंका अफगाणिस्तानशी खेळेल. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश हे संघ पहिल्या फेरीत अव्वल चारपैकी कोणतेही स्थान मिळवू शकतात, परंतु या संघांचा क्रम निश्चित राहील, असेही या वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तान A1 असेल आणि भारत A2 असेल. श्रीलंका B1 आणि बांगलादेश B2 असेल. नेपाळ आणि अफगाणिस्तानने सुपर फोरमध्ये प्रगती केल्यास ते बाहेर पडलेल्या संघाची जागा घेतील.
Cricket ODI Asia Cup India Pakistan Match Today
Sports Sri Lanka Candy