मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघातील दमदार फलंदाज श्रेयस अय्यर याने श्रीलंकाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकून घेतली. धर्मशाला येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आणि भारतीय संघाची विजयी पताका फडकावली. श्रेयस अय्यर याला या मालिकेत विराट कोहली याच्या तिसऱ्या स्थानावर खेळवण्यात आले होते. ही जबाबदारी स्वीकारून श्रेयसने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. या मालिकेत त्याने सलग तीन अर्धशतक झळकावले. त्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
भारतीय मैदानावर सलग तीन टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रेयस अय्यरपूर्वी कोणत्याही फलंदाजाने ५० च्यावर धावा केल्या नव्हत्या. परंतु अय्यरने अशी कामगिरी करत इतिहास रचला आहे. टी-२० सामन्यात सलग तीन सामन्यात ५० हून अधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने सन्मान मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत लखनऊ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात श्रेयसने नाबाद ५७ धावा केल्या. या सामन्यात भारताने ६२ धावांनी विजय मिळवला होता. धर्मशाला येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद ७४ धावांची खेळी केली आणि या सामन्यात भारताला ७ धावांनी विजय मिळवून दिला. तिसऱ्या सामन्यात त्याने ४५ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या. या कामगिरीमुळे भारताला ६ गड्यांनी विजय मिळाला. श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही टी-२० मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्मा याच्या नावावर होता. परंतु आता श्रेयसने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत भारताकडून २०० हून अधिक धावा बनवणारा श्रेयस पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयसने या मालिकेत तीन सामन्यात एकूण २०४ धावा केल्या आणि तिन्ही सामन्यात तो नाबाद राहिला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू
डेव्हिड वॉर्नर – २१७ धावा
ग्लेन मॅख्सवेल – २११ धावा
श्रेयस अय्यर – २०४ धावा
रोहित शर्मा – १६२ धावा