इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषक स्पर्धेतील पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात कॅंडी येथील पल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. अ गटातील हा सामना भारतासाठी करा किंवा मरा असा आहे. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध एका गुणावर समाधान मानावे लागले आहे. आता भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे सावट आहे. अशा परिस्थितीत काय होणार, भारत सुपर४ मध्ये जाणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
कँडीमध्ये पावसामुळे पाकिस्तानचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. सामना रद्द घोषित करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. पाकिस्तानचा संघ दोन सामन्यांत तीन गुणांसह सुपर-४ मध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी भारतीय संघ अडचणीत अडकला होता.
पाकिस्तानविरुद्ध इशान किशन आणि हार्दिक पांड्या वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाला नेपाळविरुद्ध दमदार पुनरागमन करायचे आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा २३८ धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत भारताचा सामना करणे त्याच्यासाठी सोपे नसेल. मात्र, या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी आलेली नाही. पुन्हा एकदा पावसामुळे टीम इंडियाच्या सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.
असा आहे हवामान अंदाज
सोमवारी सकाळी पल्लेकेलमध्ये पावसाची सुमारे ६० टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना ओले आउटफिल्ड दिसू शकते. तथापि, नाणेफेकीच्या वेळी (भारतीय वेळेनुसार २.३० वाजता) पावसाची शक्यता २२ टक्के आहे आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत परिस्थिती तशीच राहील. खेळाच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता ६६ टक्के असेल. अशा स्थितीत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामन्याप्रमाणेच अर्धा सामना पाहायला मिळू शकतो.
सुपर-४ ची समीकरणे
भारताला नेपाळविरुद्धचा सामना करा किंवा मरा असा झाला आहे. नेपाळविरुद्ध जिंकल्यानंतर संघ सुपर-४ मध्ये जाईल. मात्र, पराभूत झाल्यास नेपाळ पुढील फेरीत प्रवेश करेल.
जर नेपाळविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर भारताला एक गुण मिळेल आणि त्यामुळे त्याच्या एकूण गुणांची संख्या दोन होईल. अशा प्रकारे टीम इंडिया पुढील फेरीत पोहोचेल.
पुढील फेरी गाठण्यासाठी नेपाळला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. त्याला चमत्कारिक कामगिरी करावी लागेल. जरी सामना रद्द झाला तरी त्याला फक्त एक गुण मिळेल आणि तो दोन सामन्यांत एकूण एक गुण घेऊन बाद होईल.
दोन्ही संघ असे
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा. राखीव: संजू सॅमसन.
नेपाळ: रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्रसिंग आयरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतित जीसी, श्याम ढकल , संदीप जोरा, किशोर महतो आणि अर्जुन सौद.
Cricket Asia Cup India Nepal Match Rain Forecast Weather