भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेकडून तीन सामन्यांच्या मालिकेत पराभव झाला. टीम इंडियाने नऊ वर्षांनंतर आफ्रिकन भूमीवर वनडे मालिका गमावली आहे. शेवटच्या वेळी भारताचा २०१३ मध्ये पराभव झाला होता. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली हे सामने खेळण्यात आले. मात्र, झालेल्या पराभवामुळे चाहते निराश झाले आहेत.
मालिकेतील पराभवामागे अनेक कारणांची चर्चा होत आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की द्रविड संघासोबत योग्य समन्वय साधू शकला नाही. तसेच, विराट कोहली आणि बीसीसीआय वादाचा संघाच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाल्याचे काहींचे मत आहे. राहुल द्रविड आणि केएल राहुल योग्य नियोजन करू शकले नाहीत, असेही म्हणले जात आहे. ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना त्यांनी संघाबाहेर ठेवले गेले. श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश पहिल्या सामन्यात अपयशी ठरले होते. अशा परिस्थितीत द्रविड आणि राहुल यांनी पहिल्या सामन्यानंतरच कठोर निर्णय घ्यायला हवे होते व टीममध्ये बदल करायला हवे होते. याशिवाय, आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा, रुसी व्हॅनडर ड्युसेन यांसारख्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांविरुद्ध संघाला योग्य नियोजन करता आले नाही. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा या दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे आव्हान उभे केले. या सामन्यात येनेमन मलान आणि क्विंटन डी कॉक यांच्यासमोरही भारतीय गोलंदाज प्रभावी कामगिरी करू शकले नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, टी-२० कर्णधारपद सोडण्यापूर्वी मी कोहलीला समजावून सांगितले होते, पण त्यांनी ऐकले नाही. पत्रकार परिषदेत विराटने गांगुलीचा हा दावा फेटाळून लावला. यानंतर कर्णधार आणि बोर्ड आमनेसामने आल्याचे दिसून आले. त्यानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले.
या संपूर्ण प्रकरणामुळे खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मैदानात खेळण्यापेक्षा मैदानाबाहेर चाललेल्या या घडामोडींवर त्यांचे अधिक लक्ष होते अशी टीकाही केली जात आहे. या सगळ्याचा परिणाम खेळाडूंवर झाला आणि ते योग्य खेळू शकले नाही. परिणामी आपल्याला हार मानावी लागली.