नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बीसीसीआयच्या येत्या नविन सुरु होणाऱ्या २०२५-२६ क्रिकेट हंगामा साठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र संघाचे सराव सामने बंगळुरू येथे होत आहेत. त्यात नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अनुभवी रणजीपटू डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने कर्नाटक व विदर्भ विरुद्धच्या निवड सराव सामन्यात अष्टपैलु चमक दाखवली आहे. या दोन सामन्यात त्याने दोन डावांत एकूण ८ बळी घेतले व दोन्ही संघांविरुद्ध २९ धावांची खेळी करत एकूण ५८ महत्वपूर्ण धावा केल्या.
विदर्भ विरुद्धच्या सामन्यात आपल्या भेदक फिरकीने ५ बळी टिपण्याची जोरदार कामगिरी केली. २७.२ षटकांत ८३ धावा देत हे ५ बळी घेतले. फलंदाजीत देखील २९ धावांचे उपयुक्त योगदान दिले. तर त्याआधीच्या सामन्यात कर्नाटक विरुद्ध सत्यजितने २५ षटकांत ५७ धावा देऊन ३ बळी घेतले व नाबाद २९ धावा केल्या. महाराष्ट्र संघात नव्यानेच सामील झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ या संघाचे नेतृत्व करत आहे.
आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. रणजी स्पर्धे बरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात सत्यजित गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सत्यजित बच्छाव २०२४च्या महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बळी घेत उत्कृष्ठ गोलंदाज सन्मान पर्पल कॅप चा मानकरी ठरला होता. सत्यजितने एकूण २५ बळी घेत वसंत रांजणे पर्पल कॅप चा बहुमान मिळवला. सत्यजित बच्छावला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट – बेस्ट – क्रिकेटपटू चे पारितोषिक मिळाले आहे . २०१८-१९ या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत सत्यजित बच्छावने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.
यंदा देखील नाशिकाकर सत्यजित बच्छाव महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करेल याची सर्वांनाच खात्री आहे.