नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथे होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेच्या (एम सी ए इन्विटेशन लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने चंद्रोस क्लब, पुणे पाठोपाठ पूर्व विभाग संघाविरुद्धही मोठा विजय मिळवला.
पूर्व विभाग संघाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात कर्णधार अक्षत भांडारकर, सायुज्य चव्हाण, देवांश गवळी व प्रिन्स पटेलने विजयात मोठा वाटा उचलला. क्रीडक क्रिकेट मैदानावर पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत नाशिकने पहिल्या डावात कर्णधार अक्षत भांडारकर १९२, सायुज्य चव्हाण नाबाद १०२ व श्रेयस हेकरे ६१ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर ५ बाद ४५२ धावा फटकवल्या. उत्तरादाखल नाशिकाच्या गोलंदाजांनी पूर्व विभाग संघाला पहिल्या डावात सर्वबाद ८७ व फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात सर्वबाद १०२ इतकीच मजल मारून देत एक डाव व २६३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकतर्फे देवांश गवळीने पहिल्या डावात ६ व दुसऱ्या डावात ४ तर , दुसऱ्याच डावात प्रिन्स पटेलने ४ व ओजस शिरूळेने ३ तर पहिल्या डावात सायुज्य चव्हाण व दिव्येश साळवेने प्रत्येकी १ गडी बाद केला.
याधीच्या महात्मानगर क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात सायुज्य चव्हाण, कर्णधार अक्षत भांडारकर, श्रेयस हेकरे व देवांश गवळी हे चंद्रोस क्लब, पुणे विरुद्धच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत नाशिकने पहिल्या डावात सर्वबाद २५३ धावा केल्या. कर्णधार अक्षत भांडारकरने ७५ व श्रेयस हेकरेने ६७ धावा केल्या. साई कुंभारने ४ गडी बाद केले. उत्तरादाखल नाशिकच्या गोलंदाजांनी चंद्रोसला पहिल्या डावात १०९ धावांत गुंडाळले. त्यात ओम पालखेडेने ३७ धावा केल्या. नाशिकतर्फे सायुज्य चव्हाणने ३, साहिल शेंगे व दिव्येश साळवेने प्रत्येकी २ तर देवांश गवळी व प्रिन्स पटेलने प्रत्येकी १ बळी घेतला. फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात चंद्रोसने १४७ धावा केल्या. पार्थ सोनवणेने ४६ धावा केल्या. नाशिकच्या देवांश गवळीने ४ तर साहिल शेंगे, सायुज्य चव्हाण व प्रिन्स पटेलने प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठीच्या आवश्यक ४ धावा नाशिकने ८ गडी राखून पार करत विजय मिळवला.
इतर सामन्यात धुळेने पूर्व विभाग व नांदेडवर तर मेट्रोनेही नांदेड व चंद्रोसवर निर्णायक विजय मिळवले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देवांश गवळी, अक्षत भांडारकर व सायुज्य चव्हाण यांची छायाचित्रे सोबत पाठवत आहे.