नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या महिला क्रिकेटसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व ऐश्वर्या वाघ ह्या तीन खेळाडूंची महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या या तीन युवा महिला क्रिकेटपटूंची निवड झाली आहे.
सलामीची फलंदाज ईश्वरी सावकार , मध्यम गती गोलंदाज व उपयुक्त फलंदाज रसिका शिंदे यांनी यापूर्वी देखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ, तेवीस व एकोणीस वर्षांखालील अशा विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ईश्वरी सावकारची यापूर्वीच्या हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी देखील निवड झाली होती. तिच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील बीसीसीआयच्या महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. डावखुरी फिरकीपटू ऐश्वर्या वाघने राज्यस्तरीय आमंत्रितांच्या – इन्व्हिटेशन लीग व सुपरलीग – क्रिकेट स्पर्धेत नाशिकतर्फे वेळोवेळी अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे.
सदर महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने ५ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान रायपूर येथे खेळविले जाणार आहेत . महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : ५ जानेवारी – बंगाल , ६ जानेवारी – सिक्कीम, ८ जानेवारी – हरयाणा ,१० जानेवारी -गोवा, १२ जानेवारी – अरुणाचल प्रदेश.
ईश्वरी सावकार , रसिका शिंदे व ऐश्वर्या वाघ यांच्या या महत्वपूर्ण निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या तीनही खेळाडूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.