इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या ईश्वरी सावकार व तेजस्विनी बाटवाल या दोघींची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी ईश्वरी सावकार व तेजस्विनी बाटवाल या महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ईश्वरी सावकारने यापूर्वी देखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ, तेवीस व एकोणीस वर्षांखालील अशा विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ईश्वरी सावकारची मागील हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली होती व तिच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. नुकतेच ईश्वरीने वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तेजस्विनी बाटवाल यष्टीरक्षक व उत्कुष्ट फलंदाज आहे तिने देखील यापूर्वी महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
नवी दिल्ली येथे ४ ते १६ डिसेंबर दरम्यान , बीसीसीआय तर्फे वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत, महाराष्ट्राचे साखळी सामने, पुढील प्रमाणे होणार आहेत – ४ डिसेंबर – सौराष्ट्र, ८ डिसेंबर – हरयाणा, १० डिसेंबर – उत्तर प्रदेश,१२ डिसेंबर – विदर्भ, १४ डिसेंबर -बिहार, १६ डिसेंबर – पंजाब .
ईश्वरी सावकार व तेजस्विनी बाटवाल या दोघींच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी खास अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.