नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल दोन वर्षानंतर आयोजित क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो या गृह पर्वणी प्रदर्शनास नाशिकसहित जळगाव, धुळे, अहमदनगर, ठाणे, मुंबई व पुणे येथील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून नाशिक ची स्कायलाईन बदलते आहे याचीच प्रचिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून आली आहे. या चार दिवसीय प्रदर्शनाला सुमारे ४०००० नागरिकांनी भेट दिली .आज दिनांक १७ रोजी संध्याकाळी या प्रदर्शनाचा समारोप खा. हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
याप्रसंगी बोलतांना खा. गोडसे यांनी अशा प्रकारच्या एक्स्पोच्या आयोजनासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, शहराच्या वाढलेल्या कनेक्टिविटी मुळे संधींची अनेक कवाडे उघडत आहेत. येत्या काही काळात नाशिक विमान सेवेद्वारे अनेक महत्वांच्या शहरांशी जोडले जाणार आहे. तसेच नाशिक – पुणे रेल्वे सेवेचेही काम प्रगतीपथावर आहे. कनेक्टिविटी वाढल्यास अनेक संधी नाशिकला मिळतील ज्याने सर्व शहराला त्याचा लाभ होईल असेही त्यांनी नमूद केले.
१४ ते १७ एप्रिल दरम्यान आयोजित या प्रॉपर्टी एक्स्पो ला मिळालेल्या प्रतिसादामुळे शहरात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण असून येत्या १५ ते २० दिवसात सुमारे २००० सदनिकांचे बुकिंग होणार आहे. या मुळे सुमारे ६०० कोटी ची उलाढाल नाशिक शहरात होणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली .प्रदर्शन कालावधीतच सुमारे ३८० सदनिकांचे स्पॉट बुकिंग देखील झाले असल्याचे त्यांनी नमूद केले .
बांधकाम उद्योगावर इतर अनेक उद्योग -व्यवसाय अवलंबून असतात तसेच अनेक कुशल व अकुशल कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील बांधकाम उद्योगामुळे मिळतो . यासोबतच शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल देखील प्राप्त होतो. प्रॉपर्टी एक्स्पो ला मिळालेल्या प्रतिसाद परिणामस्वरूप येत्या काही दिवसात नाशिक चे एकूणच अर्थकारण देखील बदलेल असा विश्वासही रवी महाजन यांनी व्यक्त केला.
कधी काळी अगदी एक मजली – दुमजली घरांचे शहर असणारे नाशिक आता टाऊनशिप आणि इमारतींचे शहर होत आहे. नाशिक झपाट्याने विकसित होत आहे, नाशिकमध्ये अनेक हाय राईज इमारती देखील उभारल्या जात आहेत. याचबरोबर येऊ घातलेले अनेक नवीन प्रकल्प जसे समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत चेन्नई महामार्ग ,आयटी हब ,लॉजिस्टिक पार्क ,नाशिक – पुणे रेल्वे सेवा ,शहर बस सेवा , विमान सेवेद्वारे नाशिक देशातील अन्य प्रमुख शहरात सोबत वाढलेली कनेक्टिविटी या सर्व बाबीचे योग्य मार्केटिंग आणि नाशिक ब्रॅण्डिंग अन्य शहरात करण्यास क्रेडाई नाशिक मेट्रो च्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत असून यामुळे अन्य शहरातून नाशिककडे येण्याचा ओघ वाढत आहे . हेच या प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे अधोरेखित झाले असल्याचे प्रतिपादन प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर यांनी केले.
प्रदर्शनात ७० विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय तेही अगदी १५ लाखांपासून ते ५ कोटींपर्यंत बजेट मध्ये उपलब्ध होते .नागरिकांना प्रदर्शन पाहणे सुखकर होण्यासाठी संपूर्ण वातानुकुलीत डोम्स ची व्यवस्था पहिल्यांदाच करण्यात आली होती त्यामुळे अगदी भर दुपारी देखील प्रदर्शनास भेट देणाऱ्यांची गर्दी झाली असल्याचे सहसमन्वयक मनोज खिंवसरा यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार ( घटना समिती ) जितुभाई ठक्कर, राष्ट्रीय क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्र चे सचिव सुनील कोतवाल , माजी अध्यक्ष सुरेश पाटील , किरण चव्हाण , नेमीचंद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष कृणाल पाटील व मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, श्रेणिक सुराणा, सागर शहा, सुशिल बागड, अनंत ठाकरे, सचिन बागड, अतुल शिंदे, सचिन चव्हाण तसेच सर्व सदस्यांनी प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले.