नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना मुळे गेल्या अडीच वर्षांपासून अर्थकारणावर आलेली मरगळ आता दूर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो मध्ये पहिल्या दोन दिवसांत 200 सदनिकांचे बुकिंग झाले आहे. १६ एप्रिल [शनिवार] व १७ एप्रिल (रविवार) रोजी सुट्यांचा मुहुर्त साधत अनेकांनी साईट व्हिजीटचे देखील नियोजन केले आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्यात नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर, ठाणे, मुंबई व पुणे येथील नागरिकांचा समावेश असल्याचे अध्यक्ष रवि महाजन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वेगाने विकसित होणा-या नाशिकमध्ये तुलनेने फ्लॅटचे दर कमी असून फ्लॅट सोबतच प्लॉट, फार्महाऊस, शेतजमीन यासाठी पण चांगली मागणी आहे. रिअल इस्टेट क्षेत्राकडे अनेक जण गुंतवणूकीचा चांगला पर्याय म्हणून देखील बघत असतात. क्रेडाई हि बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी व जुनी संस्था असून गेल्या तीन दशकाहून अधिक कालावधीपासून क्रेडाई चे सदस्य पारदर्शकता , विश्वसाहार्ता आणि गुणवत्ता या त्रिसूत्री वर काम करत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले
क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे समन्वयक अनिल आहेर म्हणाले की, प्रदर्शनास मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्तम असून प्रदर्शनात भेट देणारे ग्राहक अनेकदा येथील सर्व पर्याय बघूंन मग नंतर पुढील काही महिन्यात निर्णय घेतात. त्यामुळे प्रदर्शन झाले की त्याचा सकारत्मक परिणाम नंतर काही कालावधी पर्यंत असतो. घर हे माणसांच्या मुलभूत गरजांपैकी एक असून स्वत:चे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. हजारोंची ही मुलभूत गरज आणि या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी हि विकसकांवर असते. त्यासोबतच बांधकाम उद्योगा मध्ये रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शहराच्या अर्थकारणा मध्ये देखील बांधकाम उद्योगाची मोलाची भूमिका असल्याचे देखील समन्वयक अनिल आहेर यांनी नमूद केले.
क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे सहसमन्वयक मनोज खिंवसरा म्हणाले की, अगदी भर दुपारी देखील प्रदर्शनास भेट देण्यार-यांची गर्दी होत असून संपूर्ण ए. सी. डोम्समुळे नागरिकांना प्रदर्शन पाहणे सुखकर झाले असल्याचे सहसमन्वयक मनोज खिंवसरा यांनी सांगितले. प्रदर्शनात ७० विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय तेही अगदी १५ लाखांपासून ते ५ कोटींपर्यंत या प्रदर्शनात उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापर्यायातून ग्राहकांना निवड करता येणार असून प्रदर्शनात बुकिंग कारणा-यास अनेक ग्राहकाभिमुख योजना देऊ केल्या आहेत. प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 8 असून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे करण्यात आले आहे .