नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाच्या धोरणामध्ये सकारात्मक बदल होत असून इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत अनेक प्रचलित नियमात बदल करण्यात येत आहेत. नुकतीच शासनाने वाळू धोरण घोषित केले आहे. क्रेडाईच्या सदस्यांनी शहर व रियल इस्टेट मार्केटिंग मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून सर्वसामान्यांना परवडणारी घरे व्यावसायिकांनी उभारावीत अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
तीन दशकांहून अधिक कालावधी पासून कार्यरत बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोच्या 2023 – 25 च्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण प्रसंगी ते बोलत होते. या पदग्रहण समारंभात वर्ष २०२३ -२५ साठी बिनविरोध निवड झालेल्या नूतन अध्यक्ष कृणाल पाटील यांनी कार्यकारणी सहित क्रेडाई नाशिक मेट्रोचे मावळते अध्यक्ष रवी महाजन यांच्याकडून पदभार स्वीकारला.
मुद्रांक नियंत्रक व नोंदणी महानिरीक्षक यांच्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल होत असून ज्याचा फायदा सर्व जनतेला होईल. रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मूळे शहर तसेच शहराच्या लगतच्या भागात देखिल विकासाला चालना मिळेल असे सांगताना ते म्हणाले नाशिक क्रेडाई ने शहरात असा एक प्रकल्प उभारावा जो राज्यात व देशात पथदर्शक ठरेल असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, क्रेडाई रुपी रोपटे नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी लावले गेले त्याचा आता वटवृक्ष झाला आहे… शहर विकासासाठी क्रेडाईने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. घरपट्टी, प्रस्तावित रिंगरोड तसेच आगामी कुंभमेळा असे काही मुद्दे सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पूर्ण एक दिवस देणार आहेत.
नाशिकच्या विकासाला चालना मिळण्यासाठी नाशिकचे मार्केटिंग करणे गरजेचे असून नाशिक -पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला देखील गती देण्यात येणार आहे. नुकतीच नाशिकची निवड ही क्वालिटी सिटी मध्ये करण्यात आली असून शहरातील सर्व लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असेही पालकमंत्री भुसे यांनी नमूद केले.
या प्रसंगी आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. सत्यजित तांबे, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाई राष्ट्रीयचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई राष्ट्रीय घटना समितीचे प्रमुख सल्लागार जितुभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुनिल कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश आप्पा पाटील, नेमीचंद पोतदार, विजय संकलेचा, सुनील भायभंग, अविनाश शिरोडे, उमेश वानखेडे व माजी उपमहापौर अजय बोरस्ते हे मान्यवर उपस्थित होते.
नाशिक हुन सुरू झालेल्या क्रेडाईने आता देशभरात विस्तार केला असून आजमितीला देशातील 217 शहरांमध्ये 13000 हुन अधिक सदस्य क्रेडाईशी जोडलेले आहेत. नाशिकमध्ये क्रेडाईचे 450 हुन अधिक सभासद असून बांधकाम व्यावसायिकांशी निगडित विविध पैलूंवर संस्था काम करते. याचसोबत बांधकाम कामगारांचे कौशल्य विकास व कल्याण, नाशिक शहराचे ब्रँडिंग या संबंधित शासकीय संस्था सोबत सकारात्मक भूमिकेतून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते. बांधकाम उद्योग हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देणारे मोठे क्षेत्र असून देशाच्या जीडीपी मध्ये देखील याचे मोठे योगदान आहे.
पदग्रहण प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना मावळते अध्यक्ष रवि महाजन म्हणाले की, करोना च्या कालावधीत अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर अतिशय कठीण परिस्थिती होती. परंतु सर्व माजी अध्यक्ष आणि सभासद यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट असे कोविड सेंटरची उभारणी केली. त्यानंतर आलेल्या युनिफाईड डीसीपीआर साठी मेंबर चे प्रशिक्षण आयोजित केले यासोबतच विविध नॉलेज सेशनचेही आयोजन करण्यात आले. सोबतच बांधकाम कामगारांचे कौशल्य विकास प्रशिक्षण वेळोवेळी आयोजित करण्यात आले. एकूणच माझ्या अध्यक्ष पदाचा कालावधी माझ्यासाठी अत्यंत संस्मरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष कृणाल पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, क्रेडाई या संस्थेचे बांधकाम उद्योगात मोलाचे स्थान आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन व युवा सदस्यांचे सहकार्य यामुळे क्रेडाई नाशिक मेट्रो येत्या काळात नवीन उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला विविध असोसिअशनचे पदाधिकारी, व्यावसायिक, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रेडाई नाशिक मेट्रो 2023 -25 ची नवी कार्यकारिणी अशी –
अध्यक्ष –
कृणाल पाटील
मानद सचिव –
गौरव ठक्कर
उपाध्यक्ष –
दिपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा
कोषाध्यक्ष –
हितेश पोतदार
सहसचिव –
सचिन बागड, अनिल आहेर, नरेंद्र कुलकर्णी, ऋषीकेश कोते
मॅनेजिंग कमिटी –
मनोज खिंवसरा , अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणीक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार, साबळे, सागर, शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निषित अटल
निमंत्रित सदस्य –
सुशिल बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, करण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा
युथविंग समन्वयक –
शुभम राजेगावकर
युथविंग सहसमन्वयक –
सुशांत गांगुर्डे
महिला विंग सहसमन्वयक –
वृषाली महाजन
Credai Nashik Metro Chief Krunal Patil Appointment