नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले, डोंगर रांगा व पाणी यांनी समृद्ध असलेल्या नाशिक ची ही पर्यावरणाची समृद्धी जपणे आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी असून सर्व घटकांनी शाश्वत प्रगतीकडे लक्ष द्यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.
शहराच्या प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक व दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी कटिबद्ध असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे ‘एअरोनॉमिक्स 2025’ या नाविन्यपूर्ण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आ.देवयानी फरांदे,आ.सीमा हिरे,आ.राहुल आहेर, नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री , महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे , क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा ,क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष व मोहिमेचे समन्वयक उदय घुगे व माजी अध्यक्ष कृणाल पाटील हे उपस्थित होते .
आपल्या भाषणात ना. पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या निसर्गाची योजना आपण बिघडवत आहोत. अनेक शहरात बहुमजली इमारती झाल्या आहेत परंतु त्या इमारतींमधील रहिवाशांना भविष्यात पाण्याचा पुरवठा कसा होईल याचे नियोजन आज करणे गरजेचे आहे. शहरात येणारे लोंढे थांबवण्यासाठी ग्रामीण भागातील संधी वाढवण्याच्या आवश्यकते वर त्यांनी भर दिला . राज्यातील 52% सांडपाणी आजही थेट नदीपात्रात सोडले जात असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली व यासाठी शासनातर्फे युद्ध स्तरावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या आधी कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली . आपल्या स्वागत पर भाषणात मोहिमेचे समन्वयक उदय घुगे म्हणाले की नाशिक ही क्रेडाई चे उगम स्थान असून क्रेडाई ने नेहमीच शहरांसाठी सकारात्मक भूमिका बजावली असून शहरातील हवा ही शहराच्या हेल्थ आणि वेल्थ याच्यासोबत संबंधित असून या मोहिमेसाठी शहरातील विविध व्यावसायिक आणि सामाजिक संस्था तसेच नागरिकांचा सहभाग मिळाला आहे.या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट “स्वच्छ हवा, शून्य कचरा, सशक्त नाशिक” असल्याचे देखील त्यांनी नमूद केले
आपल्या मनोगतात बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले “एअरोनॉमिक्स ही मोहीम म्हणजे स्वतः मध्ये बदल करून आपल्या येणाऱ्या पिढीला स्वच्छ निसर्ग देणे . ही शासन ,प्रशासन आणि नागरिक यांची एकत्रित जबाबदारी आहे. नाशिकचा विकास झपाट्याने होत असताना, आपल्याला प्रदूषणमुक्त व पर्यावरणस्नेही शहर घडवण्याची जबाबदारी अधिकच वाढते. ‘एअरोनॉमिक्स 2025’ ही केवळ पर्यावरण रक्षणाची नव्हे, तर नाशिकच्या सामाजिक आणि आर्थिक उत्कर्षाची चळवळ आहे. स्वच्छ हवा आणि कार्यक्षम कचरा व्यवस्थापनावर आधारित ही मोहीम नाशिकला वेगळी ओळख देईल. हवेचा दर्जा व कचरा व्यवस्थापन यावर आधारित श्वेतपत्रिके चे प्रकाशन देखील करण्यात आले. ना. पंकजाताई मुंडे यांनी आगामी कुंभमेळ्याचे पर्यावरण ब्रँड ॲम्बेसेडर व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
आगामी काळात पुढील उपक्रम हाती घेण्यात येईल
1.इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल मध्ये नाशिकची ग्रीन सिटी म्हणून नोंद होण्यासाठी नाशिक महानगरपालिकेला सहकार्य
2.नाशिक च्या घनकचरा व्यवस्थापन आणि हवेची गुणवत्ता वाढण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी नाशिक च्या स्टार्ट अप साठी स्पर्धा आणि विजेत्यांना रोख पुरस्कार
3.शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार
या वेळी सर्व सहभागी संस्थांकडून पर्यावरण साक्षरतेची शपथ घेण्यात आली. या प्रसंगी आ. सीमा हिरे , आ. देवयानी फरांदे व आ. राहुल आहेर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
एअरोनॉमिक्स मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे:
हवेचा दर्जा सुधारणा (AQI):
स्वच्छ इंधनावर आधारित वाहतूक
औद्योगिक प्रदूषण नियंत्रण
वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवणे
कचरा व्यवस्थापन: रिसायकलिंग व कम्पोस्टिंग
जनजागृती आणि लोकसहभाग
चर्चा सत्र
या वेळी झालेल्या चर्चा सत्रात नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री , महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण याबाबत भविष्यातील योजनांची माहिती दिली.
अनेक संस्थांचा सक्रिय सहभाग
नाशिक सिटीजन फोरम, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, नाईस, निमा, आयमा, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, नरेडको, असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक, आर्किटेक आणि इंजीनियरिंग असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक, नाशिक आयटी असोसिएशन, लघुउद्योग भारती, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, फायर सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया, इत्यादी.
मानद सचिव तुषार संकलेचा आभार प्रदर्शन करताना म्हणाले की “‘एअरोनॉमिक्स 2025’ सारख्या उपक्रमांमधून . नाशिकच्या शाश्वत विकासासाठी सर्व सामाजिक संस्था, उद्योगसमूह आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही मोहीम जनआंदोलनात रूपांतरित करावी, हीच अपेक्षा आहे.”
या प्रसंगी माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर ,सुरेश पाटील,अनंत राजेगावकर, किरण चव्हाण ,सुनील भायभंग,जयेश ठक्कर ,सुनील कोतवाल ,उमेश वानखेडे, रवी महाजन, क्रेडाई मॅनेजिंग कमिटी सदस्य , विविध संस्थांचे अध्यक्ष ,प्रतिनिधी उपस्थित होते.