नाशिक – शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रत्येक घटकांची भूमिका मोलाची असते. अशा अनेक व्यक्ती व संस्था समाजासाठी अविरतपणे कार्य करत आहेत. गेल्या ३३ वर्षांपासून समाजासाठी विविध स्तरावर काम करून क्रेडाई ने एक आदर्श घालून दिला असल्याचे गौरौद्गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी काढले.
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी आ. सीमाताई हिरे, आ. सुधीर तांबे, राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्र चे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन, स्टेट बँक ऑफ इंडिया चे सरव्यवस्थापक राजेश कुमार, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे, उपाध्यक्ष कृणाल पाटील, , मानद सचिव गौरव ठक्कर, प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर व सहसमन्वयक मनोज खिंवसरा हे उपस्थित होते.
डॉ भारती पवार पुढे म्हणाल्या की, विमानसेवेद्वारे नाशिकची कनेक्टीव्हिटी वाढविण्यासाठी त्या प्रयत्नशील असून येत्या काही काळात येऊ घातलेल्या अनेक योजनामुळे नाशिकच्या विकासाचा आलेख उंचावणार आहे. क्रेडाई द्वारे नाशिकच्या ब्रान्डींग साठी नेहमीच प्रयत्न केले असून स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे गृह प्रदर्शन सुवर्णसंधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकार द्वारे कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून या योजना यशस्वी होण्यासाठी क्रेडाई ने सकारात्मक भूमिका बजावावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
नाशिक मेडिकोसिटी व ग्लोबल टुरिझम हब होण्यासाठी प्रयत्न करावे; रवि महाजन (अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो)
घरे घेण्यासाठी सध्या अत्यंत सकारात्मक वातावरण असून सरकार कडून घोषित झालेल्या अनेक पायाभूत योजनांनी नाशिक येत्या काही वर्षात विकासाकडे अग्रेसर होत आहे. युनिफाईड डी सि पी आर मध्ये नियमांची शिथिलता आल्याने नाशिकची स्काय लाईन बदलत आहे. हॉस्पिटॅलिटी, आयटी, हेल्थ केअर, या क्षेत्रात नाशिकमध्ये गुंतवणूक होत असून यामुळे लागणाऱ्या वाढीव घरांसाठी क्रेडाई सज्ज आहे. क्रेडाई तर्फे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविले असून शहर सौदर्यीकरण आणि रोजगार निर्मिती साठी क्रेडाई नाशिक मेट्रो कार्यरत आहे. प्रस्तावित बाह्य रिंग रोड मुळे शहराचा परीघ वाढून नाशिक मध्ये अनेक नवीन संधी येतील. नाशिक जिल्ह्याच्या क्रेंद्र सरकार मधील प्रतिनिधी म्हणून डॉ भारती पवार यांनी विमानसेवेने नाशिक अधिकाधिक शहरांशी जोडण्यासाठी तसेच नाशिक मेडिकोसिटी व ग्लोबल टुरिझम हब होण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती देखील केली.
चवथ्या क्रमांकाचे शहर- राजेश कुमार (सरव्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया)
नाशिक मध्ये प्रचंड क्षमता असून ज्या प्रकारचे उपक्रम सध्या राबविण्यात येत आहेत त्यामुळे भविष्यात नाशिक हे राज्यातील चवथ्या क्रमांकाचे शहर बनेल.
वेगाने विकसित होणारे नाशिक प्रमुख शहर; अनिल आहेर (समन्वयक प्रॉपर्टी एक्स्पो)
नाशिक हे देशातील वेगाने विकसित होणारे एक प्रमुख शहर असून उद्योग, हवामान, मुबलक पाणी यामुळे त्यास विशेष पसंती मिळत आहे. त्यातच गेल्या काही कालावधीत नाशिक हे विमान सेवेने अनेक महत्वाच्या शहरांना जोडले गेले असून भविष्यातही अजून शहरे विमानसेवेने नाशिकला जोडली जाणार आहे. समृद्धी महामार्ग, सुरत – चेन्नई एक्स्प्रेस वे, मुंबई – नाशिक महामार्गाचे सहा पदरीकरण, नाशिक – पुणे रेल्वे सेवा यामुळे शहराची कनेक्टीव्हिटी वाढून नाशिक प्रगतीच्या दिशेने अग्रेसर आहे.
नाशिकच्या या प्रगतीमुळे अनेकांना नाशिकमध्ये घर, प्लॉट, फॉर्म हाउस , शॉप्स, ऑफिसेस घेण्याची इच्छा आहे. १४ ते १७ एप्रिल दरम्यान होणा-या या प्रदर्शनामध्ये ७० हून अधिक विकासकांचे १५ लाखापासून ५ कोटींपर्यंत ५०० हून अधिक पर्याय एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. याचशिवाय गृह कर्जासाठी देखील नामवंत वित्तीय संस्था या प्रदर्शना मध्ये सहभागी होणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. सर्व डोम्स हे वातानुकुलीत असून प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ अशी राहील
कार्यक्रमामध्ये आ. सीमा हिरे क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. मानद सचिव गौरव ठक्कर यांनी सर्वाचे स्वागत केले तर आभार सहसमन्वयक मनोज खिंवसरा यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बागड यांनी केले. कार्यक्रमास डॉ उमेश काळे, महेश हिरे, हेमंत धात्रक, प्रख्यात विधिज्ञ सुबोध शहा, क्रेडाई चे सदस्य तसेच शहरातील अनेक नामवंत उपस्थित होते.