नाशिक : शहर पोलिसांनी गुन्हेगारांकडून जप्त केलेला मुद्देमाल मंगळवारी (दि.१२) पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला. सोन्या चांदिचे दागिने, मोटार सायकली, मोबईल फोन, रोख रक्कम व अन्य असा मुद्देमालात समावेश होता. गेल्या वर्षभरात सर्व पोलिस ठाणे व शहर गुन्हे शाखांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे वितरण पोलिस आयुक्तांलयात पार पडले. यावेळी पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या हस्ते तीन कोटी ५० लाख ९० हजार ६५० रूपयांच्या मुद्देमालाचे वितरण करण्यात आले. या मुद्देमाल वितरण सोहळयात फियार्दीं अर्चना धात्रक, कल्पना क्षीरसागर, संदीप जगताप, ईश्वर गुप्ता, वामन निकम, विशाल शर्मा, समीना शेख, किशोर जोशी, बबन बोराडे, प्रकाश भारती आदींनी मनोगत व्यक्त करीत पोलिस खात्याचे आभार मानले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करताना काय अडचणींचा सामना करावा लागला, हे गुन्हे कसे उघडकीस आले याविषयी शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटचे सहायक पोलिस निरीक्षक कुंदन सोनोणे, युनिट दोनचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे, युनिट एकचे पोलिस नाईक प्रवीण वाघमारे, आदींनी आपले अनुभव कथक केले. कार्यक्रमास सर्व फियार्दी, त्यांचे कुटुंबिय, पोलिस उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त वसंत मोरे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.









