विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
लसीकरणाच्या नोंदणीसाठी देशभरात वापरले जाणारे कोविन अॅप हॅक करून जवळपास १५ कोटी भारतीयांचा डाटा धोक्यात आल्याचे वृत्त नुकतेच आले होते. त्यावर केंद्र सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कोविन अॅप हॅक झाल्याच्या वृत्ताला सरकारने फेटाळून लावले आहे.
कोणत्या तरी अज्ञात माध्यमामध्ये कोविन प्लॅटफॉर्म हॅक झाल्याचे वृत्त आले होते. प्राथमिकदृष्ट्या हे वृत्त खोटे आहे. पोर्टलवरील भारतीयांचा डाटा पूर्णपणे सुरक्षित आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालाने स्पष्ट केले आहे. परंतु आरोग्य मंत्रालय आणि Empowered Group on Vaccine Administration (EGVAC) या प्रकरणाची चौकशी कॉम्प्युटर आपत्कालीन प्रतिसाद पथकाकडून करून घेत आहे.
ईजीव्हीएसीचे अध्यक्ष डॉ. आर. एस शर्मा सांगतात, सोशल मीडियावर कोविन अॅप हॅक झाल्याच्या संबंधित वृत्तांवर आमचे लक्ष गेले आहे. कोविन अॅप एका सुरक्षित डिजिटल वातावरणात आहे. यातून कोणत्याही प्रकरचा कोणताही डाटा बाहेर शेअर करण्यात आलेला नाही, असा आमचा विश्वास आहे.
हॅकरचा दावा खोटा
डार्क लीक मार्केट नावाच्या एका हॅकर समुहाने ट्विटद्वारे काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, त्यांच्याकडे कोविन अॅपमध्ये नोंद केलेल्या जवळपास १५ कोटी भारतीयांचा डाटा आहे. हा डाटा ८०० डॉलरमध्ये पुनर्विक्रय करणार आहे. हा टाडा त्यांनी मूळ रूपात लीक केलेला नाही, असा दावा केला आहे. परंतु डाटा लीक केल्याचे वृत्त खोटे असून, हॅकर समुह सुद्धा खोटा असल्याचे सांगितले जात आहे.